चंडीगड : पंजाबमधील मोहाली येथील चंडीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या आक्षेपार्ह चित्रफिती तयार करण्यात आल्याची आणि त्या प्रसारित केल्याच्या कथित प्रकारावरून तेथील विद्यार्थ्यांनी रविवारी तीव्र निदर्शने केली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून एका विद्यार्थीनीसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या विद्यार्थिनीने आपल्या मित्रासह चित्रीत केलेली एक चित्रफीत प्रसारित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी तिला अटक केली. अतिरिक्त पोलीस महासंचालक गुरप्रीत देव यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह रविवारी चंडीगड विद्यापीठ परिसराला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. एका विद्यार्थिनीने एका तरुणाबरोबरची आपली चित्रफीत इतरांना पाठवल्याचे आढळले आहे, परंतु अन्य विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आक्षेपार्ह चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याचे आढळलेले नाही, असे देव यांनी पत्रकारांना सांगितले. अटक केलेल्या विद्यार्थिनीचा मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
विद्यापीठाच्या संकुलात रविवारीही विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. त्यात विद्यार्थिनी आणि विद्यार्थीही काळे गणवेश परिधान करून मोठय़ा प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यापैकी अनेकांनी विद्यापीठ प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत जोरदार घोषणाबाजी केली.
विद्यापीठ प्रशासनानेही याप्रकरणी स्पष्टीकरण दिले. त्यात वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या आक्षेपार्ह चित्रफिती समाजमाध्यमांवर पसरल्याच्या कथित वृत्ताचा इन्कार केला. अनेक विद्यार्थिनींच्या आक्षेपार्ह चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याचे आणि काही विद्यार्थिनींनी या प्रकरणात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पूर्णत: निराधार आणि चुकीची असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.
पोलीस म्हणतात अफवा..
मोहालीच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक विद्यार्थिनींच्या आक्षेपार्ह चित्रफिती बनवून त्या समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याची अफवा पसरली. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री विद्यार्थी-विद्यार्थिनी विद्यापीठ संकुलाच्या आवारात जमा झाले आणि त्यांनी निदर्शने सुरू केली. प्राथमिक चौकशीत एका विद्यार्थिनीने तिच्या मित्रासोबतची एक चित्रफीत संपर्कातील मित्र-मैत्रिणींना पाठवल्याचे उघड झाले. तिला अटक करण्यात आली आहे.