पंबाजमध्ये खऱ्या अर्थानं राजकीय भूकंप होतोय की काय, अशी चर्चा आता फक्त पंजाबच नाही तर दिल्लीच्या देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी १८ सप्टेंबर रोजी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चरणजीतसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं. आज दुपारी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर आता दोनच दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या महिला मंत्री रझिया सुलताना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये नेमकं घडतंय काय? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आज दुपारीच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ पंजाबमध्ये दिवसभरातला काँग्रेसला हा दुसरा धक्का आहे. सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात सिद्धू म्हणतात, ”तडजोडी करण्यापासून माणसाचे चारित्र्य ढासळण्यास सुरूवात होते. मी पंजाबचे भवितव्य व पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यावर तडजोड करणार नाही. त्यामुळे मी पंजाबच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.”

काँग्रेस कार्यकर्ती म्हणून काम करत राहणार!

दरम्यान, रझिया सुलताना यांनी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांना पाठवलेल्या राजीनाम्यात काँग्रेस कार्यकर्ती म्हणून काम करत राहणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. “मी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. पंजाबच्या भल्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू आणि इतर लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांप्रमाणेच मी देखील एक कार्यकर्ती म्हणून पक्षाचं काम करत राहीन”, असं या राजीनामा पत्रात रजिया सुलताना यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे, आजच सकाळी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी मंत्र्यांना खातेवाटप केलं होतं. रझिया सुलताना यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांत रझिया सुलताना यांनी राजीनामा दिला आहे.

सोनिया-राहुल गांधींचे मानल आभार!

रझिया सुलताना यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे देखील आभार मानले आहेत. “काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे मी मनापासून आभार मानते, की त्यांनी कठीण प्रसंगी मला आणि माझ्या कुटुंबाला मदतीचा हात दिला”, असं रझिया सुलताना यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एकीकडे पंजाब काँग्रेसमधील दोन महत्त्वाच्या नेत्यांनी राजीनामा दिला असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आज राजधानी दिल्लीमध्ये आहेत. आपण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसाठी दिल्लीत असलेलं निवासस्थान खाली करण्यासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे. मात्र, तरीदेखील अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार असून त्याच पार्श्वभूमीवर अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीत आल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.