कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारताच्या परराष्ट्र खात्याला मोठा धक्का बसला आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. कतारच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या माजी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या सुटकेची आशा होती. आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलं आहे?

आम्ही या माजी अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीम यांच्या संपर्कात आहोत. तसंच या प्रकरणातल्या कायदेशीर बाबींचा अभ्यास आम्ही सुरु केला आहे. कतारच्या अधिकाऱ्यांसमोर आम्ही त्यांची बाजू मांडणार आहोत. असं म्हटलं आहे.

भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. या सगळ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. गुरुवारी या आठही जणांना कतारच्या न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

नौदलाचे माजी कर्मचारी कतारमध्ये काय करत होते?

कतारमध्ये ताब्यात घेण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी दाहरा ग्लोबल टेक्नोलॉजीस अॅण्ड कन्सलटन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करत होते. ही कंपनी सैन्य दलाशी निगडीत उपकरणं पुरवण्याचं काम करते. शिवाय संरक्षण आणि इतर सुरक्षा एजन्सींची स्थानिक व्यावसायिक भागीदार आहे आणि संरक्षण उपकरणांची देखभाल करते. हे आठ कर्मचारी मागील चार ते सहा वर्षांपासून कंपनीत काम करत होते. ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक निवृत्त कमांडर पूर्णेंदू तिवारी, फर्मचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. २०१९ मध्ये त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कतारची गुप्तचर संस्था एसएसबीने या आठ जणांना ३० ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते. दोहास्थित भारतीय दूतावासास सप्टेंबरमध्ये त्यांच्या अटकेबाबत माहिती मिळाली होती. या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी भारत सरकारला त्यांना सुखरुप परत आणण्याचे आवाहन केले होते. मात्र आता या सगळ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.