पीटीआय, नवी दिल्ली
नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील वडिलोपार्जित घरावर जमावाने केलेल्या मोडतोडीचा भारताने गुरुवारी तीव्र निषेध केला. टागोर यांच्या घरावर झालेला हिंसक हल्ला थोर कवीच्या स्मृतीचा आणि त्यांच्या समावेशकतेच्या तत्त्वज्ञानाचा अपमान असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले.
अशा घटकांना आळा घालण्यासाठी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी बांगलादेशातील अंतरिम सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीदेखील जयस्वाल यांनी या वेळी केली. ‘कछरीबारी’ हे सिराजगंज जिल्ह्यात स्थित टागोर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर आणि महसूल कार्यालय आहे. येथील वास्तव्यातच टागोर यांनी त्यांच्या अनेक साहित्यकृती लिहिल्या आहेत. सहिष्णुतेचे प्रतीक पुसून टाकण्यासाठी आणि बांगलादेशचा सुसंवादी सांस्कृतिक वारसा नष्ट करण्यासाठी अतिरेक्यांनी केलेल्या सुनियोजित प्रयत्नांचा हा एक भाग होता, असे जयस्वाल म्हणाले. अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले. अशा घटना दुर्दैवाने वारंवार घडत असल्याचेही ते म्हणाले.
चौकशी समिती स्थापन
दरम्यान, बांगलादेशातील माध्यमांच्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी तीनसदस्यीय समिती स्थापन केली असल्याचे समजते.
जागतिक पातळीवर निषेध करण्याची भाजपची मागणी
भाजपने गुरुवारी रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घराच्या मोडतोडीच्या घटनेवरून बांगलादेशातील अंतरिम सरकारचा निषेध केला. तसेच या घटनेचा जागतिक पातळीवर निषेध करण्याची मागणी केली. या हल्ल्यामागे जमात-ए-इस्लामी आणि हेफाजत-ए-इस्लामचा हात असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला.
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने कोणतीही कारवाई केली नाही आणि त्यांचे वर्तन योग्य नसल्याची टीकादेखील पात्रा यांनी केली.
भारताशी चांगले संबंध हवेतच, पण…
‘आमच्या सरकारला भारताशी चांगले संबंध हवे आहेत, तथापि प्रत्येक वेळी काही तरी चूक होतेच’, असे मत बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहंमद युनूस यांनी बुधवारी लंडनमधील चॅथम हाऊस थिंक टँकचे संचालक ब्रॉनवेन मॅडॉक्स यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी व्यक्त केले. या वेळी त्यांनी भारताशी द्विपक्षीय संबंध आणि लोकशाहीची रूपरेषा आदी मुद्द्यांवर भाष्य केले.