राहुल गांधींविरोधातील याचिकेबरोबरच एकत्रित विचार

राफेल विमान खरेदी व्यवहाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी दाखल झालेल्या याचिकेची आता शुक्रवार १० मे रोजी सुनावणी होणार आहे.

राफेलसंबंधी गोपनीय कागदपत्रे उघड झाल्याने न्यायालयाने आधीच्या निकालाचा फेरविचार करावा, यासाठी ही याचिका दाखल झाली होती. न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत ‘चौकीदार चोर है’चा निर्वाळा न्यायालयानेही दिल्याचे वक्तव्य राहुल यांनी केले होते. त्याप्रकरणी दाखल झालेल्या अवमान याचिकेची सुनावणीही राफेल फेरविचार याचिकांसोबत घेतली जाईल, असे न्यायालयाने आधी जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी या दोन्ही याचिकांची सुनावणी अपेक्षित होती. मात्र कामकाज सुरू झाले तेव्हा सुनावणी वेगवेगळ्या दिवशी ठेवल्याचे उघड झाले.

या प्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, ‘‘या दोन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी होईल, असे आम्ही आधीच जाहीर केले होते. तरीही फेरविचार याचिकांची सुनावणी आज (सोमवारी) आणि अवमान याचिकेची सुनावणी १० मे रोजी ठेवली गेली आहे. या प्रकाराने आम्ही थोडे गोंधळलो आहोत. त्यामुळे आता या दोन्ही याचिकांचा एकत्रित विचार १० मे रोजीच दुपारी दोन वाजता केला जाईल.

न्या. एस.के. कौल व न्या. के.एम. जोसेफ यांचाही या विशेष पीठात समावेश आहे.

राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर ‘चौकीदार चोर है’ ही शेरेबाजी केली होती आणि ते वाक्य न्यायालयाच्या तोंडी घातले गेले होते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. गेल्या ३० एप्रिलला गांधी यांना या वक्तव्याबाबत आणखी एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची संधीही न्यायालयाने दिली होती.