पीटीआय, नवी दिल्ली
राफेल विमानाचा मुख्य सांगाडा, म्हणजे ‘विमानधडा’चे (फ्युसलाज) भारतात उत्पादन करण्यासाठी फ्रान्सस्थित ‘दसॉल्ट एव्हिएशन’ आणि ‘टाटा अॅडव्हान्स सिस्टिम लिमिटेड’मध्ये (टीएएसएल) मंगळवारी महत्त्वपूर्ण करार झाला. विशेष म्हणजे, यामुळे आता राफेलच्या विमानधडाची प्रथमच फ्रान्सबाहेर निर्मिती केली जाईल.

‘टीएएसएल’ने दिलेल्या माहितीनुसार विमानधडाच्या उत्पादनासाठी दसॉल्टबरोबर एकूण चार करार करण्यात आले आहेत. यामुळे देशांतर्गत विमान निर्मिती क्षमतेमध्ये वाढ होणार असल्यामुळे हे महत्त्वाचे पाऊस मानले जात आहे. याअंतर्गत हैदराबादमध्ये कारखाना उभारला जाणार असून २०२८पासून तेथे उत्पादन सुरू होईल. सुरुवातीला एका वर्षाला दोन विमानधडे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भारतीय सैन्यदलांसाठी राफेल विमानखरेदीचे करार करण्यात आले असून यातील काही विमानांचे उत्पादन हे भारतात केले जाणार आहे. त्या दृष्टीने दोन्ही देशांचे सरकारे तसेच कंपन्यांमध्ये यापूर्वी करार झाले आहेत. मात्र गुरुवारी झालेल्या करारामुळे प्रथमच विमानातील अत्यंत महत्त्वाचा घटक फ्रान्सबाहेर, तोदेखील भारतात उत्पादित होणे शक्य होईल.

सर्वांत महत्त्वाचा घटक

●विमानधड किंवा फ्युसलाज हा विमानातील सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. दंडगोल (सिलिंडर) आकाराच्या या पत्र्याच्या मोठ्या सांगाड्यामध्ये आसनव्यवस्था किंवा माल साठविण्याची जागा गरजेनुसार तयार केली जाते.

●आवश्यकतेनुसार विमानधडाचे आकार वेगवेगळे असतात आणि त्यावर दरवाजे, खिडक्या आदीचीही व्यवस्था केली जाते.

●अपघातावेळी या सांगाड्यामुळेच इंजिन, प्रवासी यांचे संरक्षण होत असल्यामुळे तो मजबूत असावा लागतो. त्यामुळे विमानधड हा कोणत्याही विमाननिर्मितीमध्ये महत्त्वाचा घटक मानला जातो.

राफेलच्या विमानधडाचे प्रथमच फ्रान्सबाहेर उत्पादन होईल. भारतामध्ये पुरवठा साखळीच्या सशक्तीकरणासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. आमच्या सहकार्यातून राफेल निर्मितीची क्षमता आणि दर्जा चांगला राखला जाईल.

एरिक ट्रॅपिअर, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, दसॉल्ट एव्हिएशन

या करारामुळे टाटा अॅडव्हान्स सिस्टिम्सची क्षमता अधोरेखित झाली आहे. तसेच अत्याधुनिक पद्धतीने विमाननिर्मिती करण्यासाठी भारतात असलेल्या व्यवस्थेतील बदलही प्रकर्षाने समोर आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुकारन सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, टीएएसएल