काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंजाबमधील पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा केलीय. पंजाबचा नेता कोण असावा याचा निर्णय पंजाबच्या जनतेने केला असल्याचं म्हणत त्यांनी काँग्रसेच्या आगामी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा केली. पंजाबच्या जनतेला त्यांची गरीबी, भूक आणि भीती समजू शकेल अशा व्यक्तीची गरज असल्याचंही राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

राहुल गांधी म्हणाले, “पंजाबच्या जनतेने काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांना निवडलं आहे. मी याच्याशी सहमत आहे. आम्ही सर्व एकत्र मिळून अधिक चांगल्या आणि आनंदी पंजाबच्या निर्मितीसाठी प्रयत्न करू. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पंजाबचा निर्णय आहे, हा राहुल गांधीचा निर्णय नाही. मी पंजाबच्या जनतेला, आमच्या उमेदवारांना, कार्यकर्त्यांना, युवकांना, वर्किंग कमेटीच्या लोकांना विचारलं आणि पंजाबने जे सांगितलं तोच निर्णय मी तुम्हाला सांगत आहे.”

“माझ्या मतापेक्षा पंजाबच्या जनतेचं मत अधिक महत्त्वाचं”

“पंजाब हिंदुस्तानच्या लोकांची सुरक्षा ढाल आहे. या राज्याला आपला नेता स्वतः निवडायला हवा आणि माझं काम तुमचा आवाज ऐकणं आहे, समजून घेणं आहे. माझ्या मतापेक्षा पंजाबच्या जनतेचं मत अधिक महत्त्वाचं आहे. पंजाबच्या जनतेने त्यांना एका गरीब घरातील मुख्यमंत्री हवा असं सांगितलं, जो गरीबी, भूक, त्यांची भीती समजू शकेल. पंजाबला त्या व्यक्तीची गरज आहे,” असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

“निर्णय कठीण होता, मात्र पंजाबच्या जनतेने सोपा केला”

राहुल गांधी म्हणाले, “निर्णय कठीण होता. मात्र, पंजाबच्या जनतेने सोपा केला. पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचे काँग्रेस उमेदवार चरणजीत सिंग चन्नी आहेत. सर्व काँग्रेस पक्ष एकत्र येऊन पंजाबला बदलण्याच्या मोहिमेला पूर्ण करू.”

हेही वाचा : “देशात पंतप्रधान नाही तर राजा, ज्याच्या निर्णयावर लोकांनी काहीच….”; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काँग्रेस पक्षातील नेते हिरे आहेत. मी २००४ पासून राजकारणात आहे. राजकारणाबाबत थोडा अनुभव आणि थोडी समज माझ्यातही आहे. नेता १०-१५ दिवसात तयार होत नाही. एक खरा नेता टेलिव्हिजनवरील चर्चांमध्ये तयार होत नाही. राजकीय नेता अनेक वर्षे लढून, संघर्ष करून तयार होतो. काँग्रेसकडे अशा हिऱ्यांची काहीच कमतरता नाही,” असंही राहुल गांधी यांनी नमूद केलं.