Rahul Gandhi Demands Caste census Anurag Thakur Strong Reply : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज (३० जुलै) लोकसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी झाली. जातीनिहाय जनगणनेवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मंत्री अनुराग ठाकूर भिडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सपा नेते व खासदार अखिलेश यादव यांनी राहुल गांधींच्या समर्थनात मैदानात उडी घेत ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला. लोकसभेत अर्तसंकल्पावर चर्चा चालू असताना अनुराग ठाकूर यांनी आतापर्यंतचे काँग्रेसचे पंतप्रधान आणि त्यांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची यादी वाचली. त्यानंतर ते म्हणाले, “आता मला सांगा हलवा कोणाला मिळाला? काही लोक ओबीसींबद्दल केवळ बोलत असतात. मात्र यांच्यासाठी (काँग्रेस) ओबीसी म्हणजे ओन्ली फॉर ब्रदर इन लॉ कमिशन. त्याचबरोबर ज्यांची जात कोणाला माहिती नाही, तो जातीनिहाय जनगणेच्या गोष्टी करतायत. मी कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र उत्तर द्यायला कोण उभं राहिलं ते सर्वांनी पाहिलं आहे.”

ठाकूर म्हणाले, “असत्याला पाय नसतात. ते काँग्रेस पक्षाच्या खांद्यावर बसून फिरत आहे. मदारीच्या खांद्यावर माकड असतं तसंच काँग्रेसच्या खांद्यावर असत्य आहे. राहुल गांधींच्या खांद्यावर तर असत्याचं गाठोडं आहे.” त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षांनी राहुल गांधी यांना अनुराग ठाकूर यांना उत्तर देण्याची परवानगी दिली.

राहुल गांधी म्हणाले, “अनुराग ठाकूर यांनी मला शिवीगाळ केली. माझा अपमान केला. परंतु, मला त्यांच्याकडून माफी नको.” यावेळी जगदंबिका पाल हे सभापतींच्या खुर्चीवर बसले होते. अनुराग ठाकूर यांच्या टीकेला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, “सभापतीजी, जो कोण या सभागृहात दलितांचे मुद्दे मांडतो, त्याला शिवीगाळ ऐकावी लागते. मी या शिव्या आनंदाने स्वीकारेन. महाभारतातलं उदाहरण द्यायचं झाल्यास अर्जुनाला केवळ माशाचा डोळा दिसत होता. आता आमचंही एकाच गोष्टीवर लक्ष आहे. जातीनिहाय जनगणना व्हावी ही आमची मागणी असून आम्ही सरकारला ही जनगणना करायला लावणारच. त्यासाठी मला कितीही शिवीगाळ सहन करावी लागली तरी चालेल. अनुराग ठाकूर यांनी मला शिवीगाळ केली आहे, परंतु, मला त्यांच्याकडून माफीची अपेक्षा नाही.”

हे ही वाचा >> केरळमधील भूस्खलनाच्या घटनेत ९३ जणांचा मृत्यू, १२८ जण जखमी, मदतीसाठी लष्कराला पाचारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सभागृहात खासदाराची जात विरारणं चुकीचं आहे : अखिलेश यादव

राहुल गांधी बोलू लागल्यावर सत्ताधारी खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर सभापती जगदंबिका पाल यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं. त्याचवेळी अखिलेश यादव उभे राहिले. ते म्हणाले, “सभागृहात कोणाचीही जात विचारली जाते का? एखादा सदस्य दुसऱ्या सदस्याला त्याची जात कशी काय विचारू शकतो?” त्यानंतर जगदंबिका पाल म्हणाले, “कोणताही सदस्य सभागृहात कोणाचीही जात विचारू शकत नाही.”