काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाने दहा तास चौकशी केली. त्यांतर आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांना ईडीसमोह हजर राहण्यास सांगण्यात आले असून त्यांची आजदेखील चौकशी केली जाणार आहे. सोमवारी राहुल गांधी ईडीसमोह हजर होताना काँग्रेसने मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे आजदेखील काँग्रेसचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> ‘देशात बुलडोझर; लडाखमध्ये शेपूट’: चीनने केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर कधी फिरणार?; शिवसेनेचा सवाल

नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित आर्थिक गौरव्यवहाराबाबत चौकशी करण्यासाठी राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यानंतर सोमवारी राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची दोन टप्प्यांमध्ये एकूण दहा तास चौकशी केली. या चौकशीमध्ये राहुल गांधी यांना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र आज पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आजदेखील राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा >>> प. बंगालमध्ये  मुख्यमंत्रीच कुलपती; विधेयक मंजूर

दिल्लीमध्ये काँग्रेसचे जोरदार निदर्शने

राहुल गांधी यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी याआधी २ आणि ८ जून रोजी उपस्थित राहण्यास समन्स बाजवण्यात आले होते. मात्र परदेशात असल्यामुळे त्यांनी वेळ मागितला होता. त्यानंतर १३ जून रोजी राहुल गांधी ईडीच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर झाले. यावेळी काँग्रेस पक्षाकडून राजधानी दिल्लीमध्ये सत्याग्रह मार्चच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या प्रदर्शनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर सत्याग्रह मार्चमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यामंत्री भूपेश बघेल, राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जून खर्गे, जयराम रमेश, संदीप सिंह हुडा, दिपेंदर हुडा आदी काँग्रेस नेत्यांचा समावेश होता.

हेही वाचा >>> …म्हणून वरुण गांधींनी मानले असदुद्दीन ओवेसींचे आभार; व्हिडीओ देखील ट्वीट केला

दरम्यान, राहुल गांधी ईडीसमोर हजर होताना काँग्रेसतर्फे देशभरात निदर्शने करण्यात आली. दिल्लीमध्ये २६ खासदार, ५ आमदारांसह एकूण ४५९ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या ठिकाणी केंद्रातील भाजपा सरकारविरोधात निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली.