उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथील भाजपा खासदार वरुण गांधी यांनी आज ट्विटरवर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे आभार मानले आहेत. रोजगार डेटा नमूद केल्याबद्दल वरूण गांधींनी ओवेसींचे आभार मानले आहेत.

ओवेसी यांनी सांगितले आहे की, देशात केंद्र आणि राज्य सरकारची ६० लाखांहून अधिक मंजूर पदे रिक्त आहेत, तर बेरोजगारी विक्रमी पातळीवर आहे. ओवेसी त्यांच्या भाषणाच्या व्हिडिओमध्ये विभागनिहाय रिक्त पदांची संख्या वाचताना दिसतात. एवढचं नाही तर हा त्यांचा डेटा नसून भाजपा खासदार वरुण गांधी यांनी उपलब्ध करून दिला असल्याचे ते सांगतात.

तर, वरुण गांधी यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप ट्विट केली आहे. बेरोजगारी हा आज देशातील सर्वात ज्वलंत प्रश्न असून संपूर्ण देशातील नेत्यांनी या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. बेरोजगार तरुणांना न्याय मिळाला पाहिजे, तरच देश शक्तिशाली होईल.

याबरोबर वरूण गांधींनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे की, “असदुद्दीन ओवेसींनी त्यांच्या भाषणात रोजगारावर उपस्थित केलेल्या माझ्या प्रश्नांचा उल्लेख केल्याबद्दल मी आभारी आहे.”

वरुण गांधी यांनी यापूर्वी मंत्रालये आणि विभागांमधील रिक्त पदांच्या तपशीलासह आकडेवारी ट्विट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “जेव्हा बेरोजगारी तीन दशकांच्या सर्वोच्च पातळीवर आहे, तेव्हा ही आकडेवारी धक्कादायक आहे. भरतीअभावी कोट्यवधी तरुण निराश आणि हताश असताना, ‘सरकारी आकडेवारी’वर विश्वास ठेवला तर देशात ६० लाख ‘मंजूर पदे’ रिक्त आहेत. या पदांसाठी दिलेले बजेट गेले कुठे? हे जाणून घेणे हा प्रत्येक तरुणाचा हक्क आहे!”

वरुण गांधी मागील काही दिवसांपासून सातत्याने सरकारी पदांवरील रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित करत आहेत. ते म्हणतात की, “नोकरी शोधणारे हताश आहेत आणि प्रशासकीय अकार्यक्षमतेची किंमत त्यांना चुकवावी लागत आहेत.” तसेच, त्यांनी अनेकदा पक्षाच्या विरोधात जाऊन केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून भाजपाची अडचण केल्याचे दिसून आले आहे.