पीटीआय, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या निकाल लागून १५ दिवस झाले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेविषयी शंका उपस्थित केली. ‘भारतातील ईव्हीएम ‘ब्लॅक बॉक्स’ असून ज्याची तपासणी करण्यास कोणालाही परवानगी नाही,’ असे सांगत राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

देशातील निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, त्यावेळी लोकशाही लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते, अशी टीका गांधी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर केली.

हेही वाचा >>>‘मुलांना दंगलीचे शिक्षण का द्यायचे?’ NCERT च्या पुस्तकातून अयोध्या वाद गाळल्यानंतर संचालकांचे उत्तर

वायव्य मुंबईत रवींद्र वायकर व अमोल कीर्तिकर यांच्यात झालेल्या लढतीत ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्यानंतर राहुल गांधी यांनी हे वृत्त टॅग करत ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित केली. अमेरिकी उद्याोजक एलॉन मस्क यांनीही ईव्हीएमच्या गैरवापराबाबत पोस्ट केली होती. ही पोस्टही राहुल गांधी यांनी टॅग केली.

मस्कच्या पोस्टनंतर वाद सुरू

अमेरिकी उद्याोजक एलॉन मस्क यांनी ‘ईव्हीएम’वर शंका उपस्थित करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर केल्यानंतर या वादाला तोंड फुटले. आपण ईव्हीएम हटविणे गरजेचे आहे. कारण मानव किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) ईव्हीएम हॅक होण्याचा धोका आहे. ही समस्या आता लहान असली तरी भविष्यात ती मोठी होऊ शकते, असे मत मस्क यांनी व्यक्त केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलॉन मस्क यांनी ईव्हीएम काढून टाकण्याबाबत व्यक्त केलेले मत अमेरिकेला लागू होऊ शकते, परंतु भारताला नाही, असे प्रत्युत्तर भाजपने दिले. ईव्हीएम काढून टाकण्याचे मस्क यांचे विधान अतिशय सामान्य आहे, याचा अर्थ असा आहे की कोणीही सुरक्षित डिजिटल हार्डवेअर बनवू शकत नाही. पण हे चुकीचे आहे. अमेरिका किंवा इतर काही देशांमध्ये इंटरनेट-कनेक्टेड मतदान यंत्रे तयार करण्यासाठी नियमित संगणकीय प्लॅटफॉर्म वापरतात. मात्र, भारतात हे शक्य नाही. भारतीय ईव्हीएम सुरक्षित आणि कोणत्याही नेटवर्क किंवा माध्यमांपासून वेगळे असल्याचा दावा भाजप नेते राजीव चंद्रशेखर यांनी केला.