मुझफ्फरपूर : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविरुद्ध मे महिन्यात झालेला लष्करी संघर्ष अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर पाच तासांच्या आत थांबविला,’ असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. बिहारमध्ये मुझफ्फरपूरमध्ये आयोजित रॅलीत ते बोलत होते. या वेळी ‘इंडिया’ आघाडीमधील द्रमुक पक्षाचे एम. के. स्टॅलिन आणि राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव उपस्थित होते.
बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू आहे. त्यात ते म्हणाले, ‘आज ट्रम्प काय म्हणाले, तुम्हाला माहीत आहे का? ते म्हणाले, की पाकिस्तानबरोबर तणाव कमालीचा वाढला असताना त्यांनी मोदींना फोन केला. त्यांनी २४ तासांत हा संघर्ष थांबविण्यास मोदींना सांगितले. त्यांच्या आज्ञेचे पालन मोदींनी लगोलग केले. ट्रम्प यांनी २४ तास दिले होते. पण, त्यांनी पाच तासांतच संघर्ष थांबविला.’ दरम्यान, ‘भारत-पाकिस्तानमधील संघर्ष मी थांबविला,’ असा दावा ट्रम्प सातत्याने करीत आहेत. भारताने यावर वेळोवेळी आपली भूमिका जाहीर केली आहे.
बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेला विरोध करण्यासाठी आयोजित यात्रेत राहुल गांधी सहभागी झाले होते. आणखी तीन दिवस ही यात्रा चालणार आहे.
‘गुजरात मॉडेल’वर टीका
राहुल गांधी म्हणाले, ‘भाजपच्या फायद्यासाठी ‘मतचोरी’ झाल्याचे मी खूप पुरावे दिले. येत्या काही दिवसांत मी आणखी पुरावे घेऊन येणार आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ज्या ‘गुजरात मॉडेल’चा उदोउदो झाला, ते मॉडेल म्हणजे ‘मतचोरी’चेच होते. भाजपने लोकांची मते चोरण्यास तेथून सुरुवात केली. निवडणूक आयोगाच्या सहाय्याने मोदी, शहा तेथून जिंकले. बिहारमधील हजारो लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या, की त्यांची नावे मतदारयादीतून चुकीच्या पद्धतीने वगळली गेली.’
गांधी कुटुंबच भ्रष्ट, चोर – भाजप
नवी दिल्ली : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगाजलासारखे पवित्र असून, गांधी कुटुंबच सर्वाधिक भ्रष्ट आणि ‘चोर’ कुटुंब आहे,’ अशा शब्दांत भाजपने राहुल गांधी यांच्या गुजरात मॉडेलवरील टीकेवर प्रत्युत्तर दिले. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी गांधी कुटुंबावर आरोप केला. ते म्हणाले, ‘सर्वांत भ्रष्ट आणि ‘चोर’ कुटुंब कुठले असेल, तर ते गांधी कुटुंब आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, रॉबर्ट वद्रा हे भ्रष्टाचार प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत.’
‘४३०० कोटींची देणगी कुणाला?’
नवी दिल्ली : ‘गुजरातमधील काही निनावी पक्षांना २०१९-२० आणि २०२३-२४ यादरम्यान ४,३०० कोटी रुपयांची देणगी मिळाली. निवडणूक आयोग याची चौकशी करणार, की प्रतिज्ञापत्र मागणार,’ असा प्रश्न त्यांनी केला. निवडणूक आयोगाने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. माध्यमातील वृत्तांचा हवाला त्यांनी या माहितीसाठी दिला.
संघर्ष थांबविल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा भारत-पाकिस्तानमधील मे महिन्यातील संघर्ष थांबविल्याचा दावा केला. दोन्ही देशांतील युद्ध अणुयुद्धाकडे जात होते, असेही ते म्हणाले. ‘व्हाइट हाउस’मधील कॅबिनेट बैठकीत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्या वेळी बोलणे झाल्याचाही त्यांनी दावा केला. ट्रम्प म्हणाले, ‘मी अत्यंत कणखर अशा व्यक्तीशी, नरेंद्र मोदी यांच्याशी बोलत होतो. मी म्हणालो, ‘तुमचे पाकिस्तानबरोबर काय चालले आहे?’ द्वेष खूप आहे. दीर्घ काळापासून असे सुरू आहे. मी तुमच्याबरोबर व्यापार करार करणार नाही…तुमच्यातील संघर्षाचे रूपांतर अणुयुद्धात होईल. मला उद्या फोन करा. आम्ही तुमच्याशी कुठलाही करार करणार नाही किंवा तुमच्यावर आयातशुल्क भरमसाठ लावू. तुम्हाला काहीही करता येणार नाही. अवघ्या पाच तासांच्या आत संघर्ष थांबला. तो कदाचित पुन्हा सुरू होईल. पण, तसे झाले, तर मी पुन्हा थांबवेन.’ या संघर्षात सात विमाने पडल्याचा दावाही त्यांनी केला. ही विमाने कुठल्या देशाची, हे मात्र त्यांनी सांगितले नाही.