सध्या भारतीय लोकशाहीवरच घाला घालण्यात येत आहे. मात्र लोकांवर दडपशाही करून हुकूमशाही व्यवस्था राबविणाऱ्या चीनसारखे आम्हाला करता येणार नाही. कारण विविध संस्कृतींच्या जोपासनेचा विचार कायम राहणे, हे आमच्या देशासाठी फार महत्त्वाचे आहे, असे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोलंबिया येथे केले.
दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाच्या मेडेलिन येथील ईआयए विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, ‘चीनच्या तुलनेत भारताची व्यवस्था खूपच क्लिष्ट आहे. आमच्या देशाची बलस्थानेही इतर शेजारील राष्ट्रांच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी आहेत. भारताला अतिशय जुनी आध्यात्मिक परंपरा आहे. तसेच कल्पकतेसह साकारली जाणारी विचारधारा आजच्या आधुनिक युगातही उपयुक्त ठरते. त्याच प्रथा आणि विचारधारेद्वारे भारत जगाला खूप काही देऊ शकतो. मी देशाच्या भविष्याबाबत मी खूपच आशावादी आहे, मात्र सध्या देशाच्या लोकशाहीवरील हल्ल्याचे सावट आणि चुकीचे पायंडे पाडण्याचे प्रकार दूर करणे अत्यावश्यक आहे. देशात विविध धर्म, संस्कृती आणि विविध भाषा बोलणारे लोक आहेत. अशी विविधता जपणाऱ्या समाजामध्ये संवाद होण्यासाठी लोकशाही व्यवस्थाच चांगली परिस्थिती निर्माण करू शकते,’ असेही राहुल गांधी म्हणाले.
या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी कोलंबियाचे अ्ध्यक्ष सेनेट लिडीओ ग्रासिया यांचीही भेट घेतली. यावेळी राहुल गांधी दक्षिण अमेरिकेतील चार देशांना भेट देणार आहेत.
भाजपकडून आगपाखड
कोलंबिया येथे केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर भाजपने आगपाखड केली. परदेशातील भारताची प्रतिमा मलिन करण्याचा आणि देशाला बदनाम करण्याचा राहुल गांधी प्रयत्न करत आहेत, या आरोपाचा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता गौरव भाटिया यांनी पुनरुच्चार केला. भाटिया यांनी गुरुवारी एक्सवर लिहिले की, “लंडन आणि अमेरिकेत अशी भारताची बदनामी केल्यानंतर कोलंबियातही राहुल गांधी यांनी हा प्रकार केला आहे. परदेशात भारताची बदनामी करण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाहीत.” निवडणुकीत पराजय मिळाल्यामुळे राहुल गांधी राष्ट्रभक्ती विसरले असा दावा भाटिया यांनी केला. स्वार्थी राजकारणापोटी ते भारतमातेची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोपही भाटिया यांनी केला.