Rahul Gandhi on Wife : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या लग्नाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जातात. मात्र, आता स्वतः राहुल गांधींनीच लग्नासंबंधीच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत जोडो यात्रेत एका युट्युबरला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यावर व्यक्त झाले. मुलाखतकाराने तुम्हाला कशी जोडीदार हवी आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, “माजी पंतप्रधान व त्यांच्या आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधींच्या गुणांचं मिश्रण असणाऱ्या मुलीशी लग्न करायला आवडेल.”

राहुल गांधी म्हणाले, “माजी आजी इंदिरा गांधी यांना ‘आयर्न लेडी’ म्हटलं जातं. मात्र, त्याआधी त्यांना ‘गुंगी गुडिया’ असंही म्हटलं जायचं. माझी आजी आयर्न लेडी होण्याआधी हेच लोक तिला २४ तास गुंगी गुडिया म्हणत होते. त्यानंतर अचानक गुंगी गुडिया आयर्न लेडी झाली. मात्र, ते तसं नव्हतं, माझी आजी कायमच आयर्न लेडी होती. माझी आजी माझ्या जीवनातील प्रेम होतं. ती माझी दुसरी आई होती.”

“मला माझी बायको इंदिरा गांधींसारखी असेल तर आवडेल, मात्र…”

यानंतर मुलाखतकाराने तुम्हाला आजीचे गुण असणाऱ्या मुलीशी लग्न करायचं आहे का? असा प्रश्न विचारला. यावर राहुल गांधी म्हणाले, “हा चांगला प्रश्न आहे. मला माझी बायको इंदिरा गांधींसारखी असेल तर आवडेल. मात्र, माझी जोडीदार माझी आई आणि आजी यांच्या गुणांचं मिश्रण असेल तर मला जास्त आवडेल.”

व्हिडीओ पाहा :

‘पप्पू’ चिडवणाऱ्यांना राहुल गांधींनी दिलं उत्तर

राहुल गांधी यांनी आपला ‘पप्पू’ उल्लेख करण्यावर कोणतीही हरकत नसल्याचं म्हटलं आहे. हा त्यांच्या प्रचाराचा भाग असल्याची टीका त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा मुंबईत असताना ही मुलाखत घेण्यात आली होती. “यावरुन त्यांच्या मनातील भीती दिसते. ते निराश आहेत,” असं राहुल गांधी यांनी ‘The Bombay Journey’ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

हेही वाचा : आई-मुलामधील हा गोड क्षण पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल स्मितहास्य! सोनिया गांधी-राहुल गांधींचा Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला कोणत्याही नावाने पुकारलं तरी त्यांचं स्वागत आहे. मला चांगलं वाटत आहे. कृपया माझं नाव वारंवार घेत जा,” असा टोला राहुल गांधी यांनी यावेळी लगावला होता. ‘भारत जोडो’ यात्रेने सध्या विश्रांती घेतली असून ३ जानेवारीला पुन्हा सुरुवात होणार आहे.