मागची दहा वर्षे संविधानावर ठरवून हल्ला करण्यात आला. तसंच भारताच्या मूळ संकल्पनेवर घाला घालण्यात आला. पद्धतशीरपणे या सगळ्या गोष्टी घडवण्यात आल्या. तसंच ज्या लाखो लोकांनी या गोष्टींना विरोध केला त्यांनाही लक्ष्य करण्यात आलं असा आरोप राहुल गांधींनी केला. लोकसभेत त्यांनी केलेलं भाषण हे चर्चेत आलं आहे. महात्मा गांधी चित्रपटामुळे लोकांना समजले असं जे वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं होतं त्या वक्तव्याचाही समाचार राहुल गांधींनी घेतला.

भीती पसरवण्याचं काम भाजपाने मागच्या दहा वर्षांत केलं

मागच्या दहा वर्षांत लोकांना घाबरवणं, तुरुंगात टाकणं हे प्रकार सर्रास सुरु होते. जे लोक भाजपाच्या विरोधात बोलतील त्यांच्या विरोधात ठरवून कारवाया झाल्या. मीडियाचा वापर करुन मलाही नावं ठेवण्यात आली. माझ्यासाठी गंमतशीर भाग होता तो म्हणजे ५५ तासांची ईडी चौकशी. कारण ती चौकशी संपल्यानंतर त्या अधिकाऱ्याने कॅमेरा बंद केला आणि मला म्हणाला राहुल तु्म्ही एखाद्या दगडासारखे इथे ५५ तास बसून आहात तुम्ही हलत कसे काय नाही? जेव्हा अशा प्रकारचा राजकीय हल्ला केला जातो तेव्हा तुम्ही स्थितप्रज्ञ असावं लागतं. आम्ही भारताच्या मूळ संकल्पनेसह उभे आहोत त्यामुळे आम्हाला उर्जा मिळते. आम्ही अशा संकटांना निर्भिडपणे तोंड देऊ शकतो असं राहुल गांधी म्हणाले. आमची उर्जा भगवान शंकर आहेत असं राहुल गांधींनी म्हटलं आणि त्यानंतर स्पीकर ओम बिर्ला यांनी यावर आक्षेप घेतला. कुठलंही चित्र तुम्ही लोकसभेत दाखवू शकत नाही असं ते राहुल गांधींना म्हणाले. ज्यानंतर आम्हाला भगवान शंकराकडून कशी प्रेरणा मिळाली हे राहुल गांधींनी भाषणात सांगितलं.

परमात्मा आणि मोदींचा रोज संवाद

तुम्हाला फक्त सत्ता हवी आहे. आम्ही त्या पलिकडे गेलो आहोत. मला विरोधी पक्षात बसल्याचा अभिमान आहे असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत. मात्र आपले जे पंतप्रधान आहेत त्यांचा थेट परमात्म्याशी संवाद आहे. ते रोज देवाशी संवाद साधतात. परमात्मा आणि मोदींशी चर्चा करतो. आपण सगळे जैविक (बायोलॉजिकल) आहोत. आपण जन्माला आलो आहोत, एक दिवस आपला मृत्यू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अजैविक (नॉन बायोलॉजिकल) आहेत. त्यांनी म्हटलं की महात्मा गांधींचा मृत्यू झाला आणि गांधी सिनेमा आला म्हणून जगाला त्यांची ओळख झाली. दुर्लक्षाची परिसीमा लक्षात घ्या. सिनेमामुळे गांधी जगाला कळले असं पंतप्रधान म्हणाले होते. पण मी सांगू इच्छितो महात्मा गांधींचा मृत्यू झालेला नाही ते आहेत. कारण धैर्य किंवा धाडस याबाबत एक धर्म बोलत नाही. तर प्रत्येक धर्म या गोष्टीचा उल्लेख करतो.

हे पण वाचा- “गडकरी हसत नाहीत, राजनाथ सिंह बोलत नाहीत, कारण मोदीजी…”, राहुल गांधींनी खोचक टीका करताच…

इस्लाममध्ये देवाच्या दरबरात भीतीला स्थान नाही

इस्लाममध्येही सांगितलं आहे की देवाच्या दरबारात भीतीला जागा नाही. इस्लाममध्ये दुवा मागितली जाते तेव्हा अभय मुद्रा दिसते. गुरुनानक यांचाही हात अभय मुद्रेत आहे. ज्या धर्मावर तुम्ही रोज आक्रमण करता त्या धर्माचे गुरुनानक आहेत. अभय मुद्रा हाच काँग्रेसचा हात आहे. घाबरु नका आणि दहशत निर्माण करु नका हे सगळेच धर्म सांगत आहेत. असाही टोला राहुल गांधींनी लगावला. सत्य आणि अहिंसा हाच विचार गुरुनानक यांनी पसरवला. येशूच्या चित्रातही अभय मुद्रा आहे, गौतम बुद्धाची अभय मुद्रा आहे. घाबरु नका, घाबरवू नका. महावीरांनीही हाच विचार मांडला. भारताच्या इतिहासात तीन पायाभूत कल्पना आहेत. मोदी एकदा भाषणात म्हणाले होते की आपल्या देशाने कधीही कुणावर आक्रमण केलं नाही, याचं कारण आहे की आपला देश अहिंसा मानणारा देश आहे. आपल्या देशातल्या सगळ्या महापुरुषांनी अहिंसा हाच विचार मांडला असं राहुल गांधी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नरेंद्र मोदींनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं?

“महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हतं. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केलं नाही” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. त्यावर आज राहुल गांधींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.