भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) झांसी आणि महोबा येथे प्रचार सभांना संभोधित केले. त्यांनी प्रत्येक सभेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधींना त्यांनी ‘बाबा’ आणि ‘भैय्या’ म्हणून संबोधले.  राहुल गांधींच्या भाषणावर टीका करताना मोदी म्हणाले, ‘राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे कॉमेडी असते. तुम्ही सर्वजण टीव्हीवर कपिल शर्माचा कॉमेडी शो पाहात असाल. तो लवकरच बंद होणार आहे आणि त्याएवजी मनोरंजानासाठी काँग्रेस नेत्यांची एकत्रीत भाषणे प्रसारित केली जाणार आहेत. यामुळे सर्वांचाच निवडणुकीतील थकवा कमी होईल.’
सभेत त्यांनी राहुल गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधानांना महागाई, भ्रष्टाचार, मोदी लहर काहीच दिसत नाही. त्यांना फक्त माता – मुलगाच दिसतो असा टोला त्यांनी लगावला. तर राहुल गांधीवर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले, राहुल गांधींना सध्या गुजरातवर भाषण करतात. गुजरातमध्ये लोकायुक्त आल्यास मोदी तुरुंगात जातील असे ते सांगतात. पण गुजरातमध्ये लोकयुक्त असून याप्रकरणी काँग्रेसच्याच गुजरातमधील नेत्याला शिक्षा झाली होती असे मोदींनी सांगितले. ‘गुजरातची लोकसंख्या सहा कोटी, तर देशाची लोकसंख्या १२४ कोटी आहे. मग गुजरातमध्ये २७ हजार कोटी रोजगार कसा उपलब्ध होईल. त्यामुळे राहुल गांधींनी भाषण आधी तपासून घेणे गरजेचे आहे. सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार ज्यांच्याशी तुमचं पटत नाही तेच तुम्हाला असे खोटे भाषण लिहून देत असावेत असा चिमटाही त्यांनी राहुल गांधींना काढला आहे.