Rahul Gandhi News : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि हरियाणात २५ लाख मतांची चोरी झाली असा आरोप केला. एवढंच नाही तर एका ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणाच्या निवडणुकीत १० मतदान केंद्रांवर जाऊन २२ वेळा मतदान केलं असाही आरोप राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या आरोपांना आता भाजपाने उत्तर दिलं आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी उत्तर दिलं आहे.

राहुल गांधी यांनी काय आरोप केला?

निवडणूक भाजपाची उघडपणे मदत करतो आहे. हरियाणातल्या एका बूथवर एका महिलेचं नाव २२३ वेळा होतं. या महिलेने कितीवेळा मतदान केलं? याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. फेक फोटो असलेले १ लाख २४ हजार १७७ मतदार होते. मतदार यादीत एका महिलेने नऊ जागी मतदान केलं. निवडणूक आयोग या सगळ्याकडे दुर्लक्ष करतो आहे कारण त्यांना भाजपाला मदत करायची आहे.असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर आता किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींना उत्तर दिलं आहे.

ब्राझीलच्या महिलेचं नाव हरियाणाच्या मतदार यादीत कसं काय?

राहुल गांधींनी एका तरुणीचा फोटो पत्रकार परिषदेत दाखवला. ते म्हणाले या मुलीने वेगवेगळ्यां नावांनी २२ ठिकाणी मतदान केलं आहे. या तरुणीने सीमा, संगीता, सरस्वती अशी नावं वापरुन मतदान केलं आहे. तसंच हरियाणाच्या मतदार यादीत ब्राझिलियन महिला काय करते आहे? असाही प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला. हरियाणामध्ये दोन कोटी मतदार आहेत. मात्र २५ लाख मतांची चोरी झाली आहे. याचाच अर्थ आठ पैकी एक मतदार हा बनावट होता. त्यामुळेच काँग्रेसचा पराभव झाला असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

किरेन रिजिजू काय म्हणाले?

“राहुल गांधी मतचोरी झाल्याचा आरोप करत आहेत. मात्र त्यामध्ये काही तथ्य नाही. ते स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांनी मागच्या वेळी एका महिलेचा फोटो टीशर्टवर छापला होता आणि तो फोटो असलेला टी शर्ट घालून राहुल गांधींसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र त्यावेळी या महिलेनेच यावर आक्षेप घेतला होता. जर मतदार यादीत घोळ आहे असं राहुल गांधींचं म्हणणं आहे तर मग ते न्यायालयात का जात नाहीत? निवडणूक आली की राहुल गांधी कोलंबिया, थायलँडला वगैरे निघून जातात.” असं म्हणत किरेन रिजिजूंनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.