Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिवाळीच्या निमित्ताने बेसनाचे लाडू आणि इमरती बनवली. राहुल गांधी यांनी सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसंच जुन्या दिल्लीतल्या घंटेवाला स्वीट शॉपला भेट दिली. या शॉपमध्ये जाऊन बेसनाचे लाडू आणि इमरती तयार केली.
काँग्रेसच्या राहुल गांधींची दिवाळी खास
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या मिठाईच्या दुकानातला व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी मिठाई दुकानाच्या मालकाशी गप्पा मारल्या. त्यानंतर दोघंही इमरती आणि बेसन लाडू तयार करायला जातात हे देखील या व्हिडीओत पाहण्यास मिळतं आहे. तसंच याबाबत राहुल गांधींनी पोस्टही केली आहे.
राहुल गांधींची पोस्ट काय?
राहुल गांधी म्हणाले, जुन्या दिल्लीतल्या प्रसिद्ध आणि ऐतिहासिक घंटेवाला मिठाई या दुकानाला भेट दिली. आज इमरती आणि बेसन लाडू तयार करण्याचा प्रयत्न केला. या दुकानाची खासियत ही आहे की हे अनेक वर्षांपासून खवय्यांसाठी पर्वणी ठरतं आहे. चवीसह मनाला आनंद देणारी यांच्या दुकानातली मिठाई असते. दिवाळी म्हटलं की या सणाचा गोडवा फक्त थाळीत नसतो तर समाजातल्या नात्यांमध्ये तो दिसून येतो. राहुल गांधी यांनी असंही म्हटलं आहे की तुम्ही सांगा की तुम्ही दिवाळी कशी साजरी करता? ही दिवाळी तुमच्यासाठी कशी खास आहे? असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
मिठाईच्या दुकान मालकाने काय म्हटलं आहे?
जुन्या दिल्लीतील घंटेवाला मिठाईचे मालक राहुल गांधींना म्हणाले आता तुमच्या लग्नाची आम्ही वाट पाहतो आहोत. तुम्ही लवकरच लग्न करायला हवं असं या दुकान मालकाने म्हटलं. दुकान मालक म्हणाला आमच्या दुकानाने तुमचे पणजोबा पंडित नेहरु, तुमची आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी यांच्यासह तुमची बहीण प्रियांका गांधी यांनाही इथली मिठाई खाऊ घातली आहे. आता तुम्ही आलात याचाही आनंद आहे. आता तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही लवकर लग्न करा, आम्ही वाट पाहतो आहोत. राहुल गांधी या प्रश्नावर काहीही बोलले नाहीत ते फक्त हसले.
युजर्सच्या प्रतिक्रिया
तुम्ही लोकांमध्ये मिसळणारे नेते आहात. खूप छान व्हिडीओ असं काही युजर्सनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी दुकानदाराला खूप आदराने वागवलं. त्यांच्यातला आदर हा त्यांचा स्थायी भाव आहे. असंही काही युजर्सनी म्हटलं आहे. या व्हिडीओवर अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत.