पीटीआय, चंडीगड

हरियाणाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय पुरन कुमार यांच्या आत्महत्येला जबाबदार अधिकाऱ्यांना अटक करा, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. राहुल यांनी चंडीगडमध्ये कुमार यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुमार यांच्या मृत्यूप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी राहुल यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये केली.

वाय पुरन कुमार हे ७ ऑक्टोबरला त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले होते. त्यांची पत्नी अमनीत पी कुमार या आयएएस अधिकारी असून हरियाणाच्या परदेशी सहकार्य विभागाच्या आयुक्त आणि सचिव आहेत. ७ ऑक्टोबरला त्या मुख्यमंत्री सैनी यांच्या शिष्टमंडळाबरोबर जपानच्या दौऱ्यावर गेल्या होत्या.

कुमार कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर, पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, याप्रकरणी मुक्त आणि निष्पक्ष चौकशी होईल आणि कारवाई केली असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला दिले होते. मात्र, त्यांनी त्याचे पालन केले नाही.

हा गेल्या १० किंवा १५ दिवसांतील प्रश्न नाही. अनेक वर्षांपासून या अधिकाऱ्याची कारकीर्द, प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी त्यांचे नैतिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत होता. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस</p>

पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई

राहुल गांधी यांच्या भेटीपूर्वी राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरा राज्याचे पोलीस महासंचालक शत्रुजीत कपूर यांना रजेवर पाठवले. त्यापूर्वी रोहतकचे पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजरनिया यांची बदली करण्यात आली. पुरन यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे लिहिली होती. त्यामध्ये या दोघांचा समावेश होता. या अधिकाऱ्यांनी आपल्याविरोधात जातीच्या आधारे भेदभाव, जाणीवपूर्वक मानसिक छळ, जाहीर अपमान आणि छळ केल्याचे पुरन यांनी चिठ्ठीमध्ये नमूद केले होते.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

रोहतक जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप कुमार यांनी मंगळवारी स्वतःवर बंदुकीच्या गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी कथितरित्या एक सहा मिनिटांची ध्वनिचित्रफित आणि तीन पानी चिठ्ठी ठेवली. त्यामध्ये त्यांनी मृत वाय पुरन कुमार यांच्याविरोधात लाचखोरीचे आरोप केले आहेत. मात्र, या ध्वनिचित्रफितीची आणि चिठ्ठीची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही.