थकीत वेतनाच्या मुद्द्यावरून पूर्व दिल्लीतील सफाई कर्मचारी करीत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शुक्रवारी सकाळी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आंदोलनामध्ये सहभागी झाले. कर्मचाऱयांच्या धरणे आंदोलनात येऊन राहुल गांधी यांनी थेट रस्त्यावर ठाण मांडले. कर्मचाऱयांचे मासिक वेतनही त्यांना वेळेवर मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधी केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारवर टीका केली.
दरम्यान, राहुल गांधी यांनी सफाई कर्मचाऱयांच्या आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी कर्मचाऱयांचे थकीत वेतन देण्यासाठी ४९३ कोटी रुपयांचा निधी पूर्व दिल्लीतील तीन महापालिकांकडे आजच्या आज देण्यात येईल, असे जाहीर केले. थकीत वेतनाच्या मुद्द्यावरून दोन जूनपासून पूर्व दिल्लीतील सफाई कर्मचारी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनानंतर तेथील तीन महापालिकांच्या महापौरांनी जंग यांची भेट घेतली होती. या तीनही ठिकाणी भाजपच सत्तेमध्ये आहे. या प्रकरणात महापालिकांना निधी मिळवून देण्यासाठी जंग यांनीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी महापौरांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार ४९३ कोटी रुपयांचा निधी तातडीने या तीनही महापालिकांना देणार असल्याचे जंग यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi mounted attack on the centre and delhi government over non payment of salaries to municipal sanitation workers
First published on: 12-06-2015 at 01:33 IST