Rahul Gandhi On IPS Puran Kumar Suicide Case : हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा गुंता पोलीस अद्यापही सोडवू शकले नाहीत. पूरन कुमार यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

वाय. पूरन कुमार यांनी जीवन संपवण्यापूर्वी एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती, त्या नोटमध्ये कार्यालयातील समस्यांचा उल्लेख करण्यात आलेला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हरियाणाचे पोलीस महासंचालक कपूर आणि रोहतकचे पोलीस अधीक्षक बिजारनिया यांची नावं नमूद केली होती. त्यानंतर बिजारनिया यांना पदावरून हटवण्यात आलं, तर पोलीस महासंचालकांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेलं आहे.

दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वाय. पूरन कुमार यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी संवाद साधत हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांच्यावर जोरदार टीका केली. तुमचं नाटक थांबवा आणि अंत्यसंस्काराला परवानगी द्या, असं म्हणत राहुल गांधींनी हरियाणा सरकारला सुनावलं आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी हे वाय पूरन कुमार यांच्या कुटुंबाला न्याय देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. गांधी म्हणाले की, “हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी पूरन कुमार यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल असं आश्वासन दिलं. मात्र, आज तीन दिवस उलटून गेले आहेत, तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. वाय पूरन कुमार यांच्या दोन मुली आहेत ज्यांनी त्यांचे वडील गमावले आहेत आणि त्यांच्यावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

राहुल गांधी पुढे म्हणाले की, “हरियाणा सरकारच्या कारवाईत होणाऱ्या विलंबामुळे कोट्यवधी दलितांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. ही एक शोकांतिका आहे. ते एक आयपीएस अधिकारी होते. त्यामुळे कोट्यवधी नागरिकांना चुकीचा संदेश जातो की तुम्ही कितीही यशस्वी किंवा बुद्धिमान असलात तरी तुम्हाला चिरडलं जाऊ शकतं. पंतप्रधान मोदी आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझा संदेश आहे की, वाय. पूरन कुमार यांच्या मुलींना तुम्ही दिलेलं वचन पूर्ण करा आणि अंत्यसंस्काराला परवानगी द्या. तसेच तुमचं आता हे सुरु असलेलं नाटक थांबवा आणि कुटुंबावर दबाव आणणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.