Donald Trumps Polarising Campaign Backed By Unemployed, Says Rahul Gandhi: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, “त्यांच्या ध्रुवीकरण मोहिमेला बेरोजगारांचा पाठिंबा आहे”. कोलंबियाच्या ईआयए विद्यापीठात ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादण्याच्या भूमिकेवर ही टिप्पणी केली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामागे बेरोजगारीचे कारण असल्याचे सांगण्याची राहुल गांधींची ही पहिलीच वेळ नाही. २०१७ मध्ये, प्रिन्स्टन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे नेते जगभरात निवडून येत आहेत कारण लोक बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत.

“मला वाटते, मोदी आणि काही प्रमाणात ट्रम्प उदयास येण्यामागे मुख्य कारण म्हणजे भारत आणि अमेरिकेतील नोकऱ्यांचा प्रश्न. आपल्या लोकसंख्येचा एक मोठा भाग असा आहे की, ज्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत आणि त्यांना भविष्य दिसत नाही. म्हणूनच त्यांना वेदना होत आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारच्या नेत्यांना पाठिंबा दिला आहे”, असे राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

यावेळी कोलंबिया येथे बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, ” अमेरिकेत ट्रम्प यांच्या ध्रुवीकरणाला पाठिांबा देणारे बहुतेक लोक असे आहेत ज्यांनी उत्पादन क्षेत्रात आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत”.

म्हणूनच, “चीनशी स्पर्धा करू शकेल अशा लोकशाही वातावरणात उत्पादनाचे मॉडेल विकसित करणे हे आव्हान आहे”, असे ते म्हणाले.

भारतात, सध्या आर्थिक विकास होत असूनही, “आपण सेवा-आधारित अर्थव्यवस्था असल्याने आणि उत्पादन करण्यास असमर्थ असल्याने नोकऱ्या देऊ शकत नाही”, असे राहुल गांधी म्हणाले.

कोलंबियातील ईआयए विद्यापीठात भारताबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, “मी भारताबद्दल खूप आशावादी आहे, परंतु त्याच वेळी, भारताच्या व्यवस्थेत काही दोष आहेत ज्यावर त्याला मात करायची आहे. सर्वात मोठी समस्या म्हणजे भारतात होत असलेला लोकशाहीवरील हल्ला. सध्या, भारतात लोकशाहीवर मोठ्या प्रमाणात हल्ला होत आहे, जो एक धोका आहे. वेगवेगळ्या परंपरांना भरभराटीला येऊ देणे खूप महत्वाचे आहे. आपण चीन जे करतो ते करू शकत नाही, आवाज दाबून हुकूमशाही समाज चालवू शकत नाही.”