Rahul Gandhi On Maha Kumbh Mela: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गेल्या महिन्यापासून महाकुंभमेळा सुरू आहे. या महाकुंभमेळ्याला देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाकुंभमेळ्याला जाणार की नाही याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. अशात दोन दिवसांच्या रायबरेली दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांना, ते महाकुभमेळ्याला जाणार आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला होता.

रायबरेलीच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. या संवादादरम्यान ते म्हणाले, “भाजप-आरएसएसचे लोक म्हणतात की इंग्रजी भाषा शिकू नये. मोहन भागवत म्हणतात की आपण इंग्रजीत बोलू नये. पण इंग्रजी भाषा हे एक शस्त्र आहे, जर तुम्ही ही भाषा शिकली तर तुम्ही कुठेही जाऊ शकता, मग ते तामिळनाडू, जपान असो, मुंबई असो किंवा कोणत्याही कंपनीतील नोकरी असो. त्यांना वाटते की तुम्ही इंग्रजी शिकू नये कारण जिथे ही भाषा वापरली जाते तिथे दलित, आदिवासी आणि गरीबांनी येऊ नये असे त्यांना वाटते. पण इंग्रजी हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. हिंदी देखील महत्त्वाची आहे, तुमची मुळे तोडणे योग्य नाही. पण इंग्रजी देखील खूप महत्त्वाची आहे.”

या रायबरेली दौऱ्यादरम्यान ते एका कार्यक्रस्थळी कारमधून उतरले तेव्हा, काही पत्रकारांना त्यांना ते महाकुंभमेळ्याला जाणार का? असे विचारण्यात आले. तेव्हा ते पत्रकारांना नमस्कार असे म्हणाले आणि पुढे निघून गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहे. यावेळी त्यांनी सर्वप्रथम, बछराव येथील कामगारांच्या एका कार्यक्रमात भाषण. येथे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “भाजपाने जीएसटी आणि नोटाबंदी लागू केली. यामुळे लहान व्यावसायिक उद्ध्वस्त झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने प्रामाणिकपणे काम केले तर देशातील कोट्यवधी तरुणांना रोजगार मिळू शकेल.”