‘पंतप्रधान उत्तराखंडमधील भूकंपाची खिल्ली उडवतात. स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाची थट्टा करतात. मात्र विरोधी पक्षांच्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत,’ अशा शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. ‘अखेर आज भूकंप झालाच,’ असे म्हणत पंतप्रधान मोदींनी लोकसभेत बोलताना राहुल गांधींची चेष्टा केली होती. पंतप्रधान मोदींच्या या टिकेला राहुल गांधींनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल गांधी यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन (OfficeofRG) पंतप्रधान मोदींना काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. ‘८ नोव्हेंबर २०१६ म्हणजेच नोटाबंदीनंतर किती प्रमाणात काळा पैसा बाहेर आला?, नोटाबंदीच्या निर्णयामुळे प्राण गमावलेल्या किती लोकांना मदत देण्यात आली?, पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय घेण्याआधी कोणाचा सल्ला घेतला होता?, तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा सल्ला का विचारात घेतला नाही? ८ नोव्हेंबर २०१६ च्या सहा महिन्यांआधी बँक खात्यांमध्ये २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करणारे कोण कोण होते?,’ असे प्रश्न राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पंतप्रधानांना विचारले आहेत.
The Prime Minister mocks the tragedy of Uttarakhand & insults the freedom struggle but has no answers to the opposition's questions pic.twitter.com/82Vd5yLhDM
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 7, 2017
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी त्यांच्याकडे असणाऱ्या कागदपत्रांमुळे भूकंप होईल, असे विधान केले होते. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना राहुल यांच्या भूकंपाबद्दलच्या विधानाची खिल्ली उडवली. ‘अखेर भूकंप झालाच. या भूकंपाची धमकी तर खूप आधीच देण्यात आली होती. मात्र काल (सोमवारी) भूकंप झालाच,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी त्यांच्याकडे असणाऱ्या कागदपत्रांमुळे भूकंप होईल, असे विधान केले होते. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना राहुल यांच्या भूकंपाबद्दलच्या विधानाची खिल्ली उडवली. ‘अखेर भूकंप झालाच. या भूकंपाची धमकी तर खूप आधीच देण्यात आली होती. मात्र काल (सोमवारी) भूकंप झालाच,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ‘जेव्हा एखाद्याला घोटाळ्यांमध्येही सेवाभाव, नम्रता दिसू लागते, तेव्हा धरणी मातेलादेखील दु:ख होतो आणि भूकंप होतो,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी मंगळवारी राहुल गांधींची लोकसभेत खिल्ली उडवली.