समाजात द्वेष पसरवून दरी निर्माण करणाऱ्या संघाविरोधात लढणे मी कधीही थांबवणार नाही. त्यांच्याविरोधात बोललेल्या प्रत्येक वक्तव्यावर मी ठाम आहे, असे ट्विट काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. उल्लेखनीय म्हणजे बुधवारी सर्वोच्च न्यायालयात संघाची बदनामी केल्याबद्दलच्या खटल्यात राहुल यांनी घुमजाव करत आपण संघाला नाही तर संघाशी संबंधित व्यक्तीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केल्याचे म्हटले होते. त्यांच्या या भुमिकेवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. गुरूवारी मात्र त्यांनी पुन्हा घुमजाव करत आपल्या मतावर ठाम असल्याचे म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी भिवंडीतील प्रचारसभेदरम्यान राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत संघाने भिवंडी न्यायालयात राहुल गांधीविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. आपल्याविरोधातील खटला रद्द करण्यात यावा, यासाठी राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी त्यांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम केलेले नसून, या संघटनेशी संबंधित एका व्यक्तीवर आरोप केले असल्याचे म्हटले होते.
जर याचिकाकर्त्यांचे राहुल गांधींच्या स्पष्टीकरणावरून समाधान झाले असेल, तर न्यायालय हा खटला रद्द करू शकते, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे वकील यू. आर. ललित यांना सांगितले होते.
संग्रहित लेख, दिनांक 25th Aug 2016 रोजी प्रकाशित
राहुल यांचे घुमजाव, संघाबाबतच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे ट्विट
उल्लेखनीय म्हणजे सर्वोच्च न्यायालयात त्यांनी संघाला आपण असे म्हटले नव्हते असे सांगितले होते.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 25-08-2016 at 16:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi says i will never stop fight against rss