पीटीआय, नवी दिल्ली, पाटणा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मतचोरीच्या आरोपांचा पुनरुच्चार करताना निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. “मतांची चोरी होत असताना निवडणूक चौकीदार चोरी होताना पाहत राहिले,” अशी टीका राहुल यांनी शुक्रवारी केली. तर राहुल गांधी जाणीवपूर्वक लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला.
राहुल गांधी यांनी गुरुवारी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर थेट आरोप केले होते. शुक्रवारी त्यांनी ‘एक्स’वर एक ध्वनिचित्रफित प्रसिद्ध करत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका केली. दरम्यान, निवडणूक आोगाने राहुल गांधी यांच्या आरोपांचे गुरुवारी खंडन केले. राहुल यांचे आरोप चुकीचे आणि निराधार आहेत असे आयोगाने म्हटले आहे. “राहुल गांधी यांचा गैरसमज झाला आहे, मात्र जनतेपैकी कोणालाही ऑनलाईन पद्धतीने कोणाचेही मत काढून टाकता येत नाही,” असा दावा आयोगाकडून करण्यात आला.
भाजपचे प्रत्युत्तर
राहुल गांधी यांनी संस्थांना दोष देण्यापेक्षा आपल्या नेतृत्वातील सातत्यपूर्ण अपयशाची जबाबदारी स्वीकारावी, असा सल्ला केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी शुक्रवारी दिला. राहुल यांचे वर्तन योग्य नाही असे ते दिल्लीमध्ये आयोजित ‘फिक्की’च्या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना म्हणाले. तर, राहुल गांधी देशात हिंसा भडकावून जाणीवपूर्वक आणि पद्धतशीरपणे लोकशाही दुर्बल करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते रवीशंकर प्रसाद यांनी पाटण्यात बोलताना केला.
सकाळी ४ वाजता उठा, ३६ सेकंदांमध्ये दोन मतदारांचे नाव काढून टाका, त्यानंतर परत झोपी जा – अशा प्रकारे मतांची चोरी होते! निवडणूक चौकीदार जागा राहिला, चोरी होताना पाहत राहिला, चोरांचे संरक्षण करत राहिला.- राहुल गांधी, नेते, काँग्रेस
निवडणुकांमधील अपयशावर पांघरुण घालण्यासाठी राहुल गांधी कोणत्याही संस्थेला लक्ष्य करू शकत नाहीत किंवा लक्ष दुसरीकडे वळवू शकत नाहीत.- किरेन रिजीजू, केंद्रीय मंत्री
राहुल यांनी असे लिहिले की तरुण, विद्यार्थी आणि ‘जेन-झी’ राज्यघटना व लोकशाहीचे संरक्षण करतील आणि मतचोरी थांबवतील. त्यांना काय म्हणायचे आहे? ते देशामध्ये हिंसा भडकावत आहेत.- रवी शंकर प्रसाद, नेते, भाजप