काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी सुरक्षेसंबंधी संसदीय स्थायी समितीची बैठक अर्ध्यात सोडून निघून गेले. यावेळी राहुल गांधींसोबत त्यांच्या पक्षातील नेतेही बैठकीतून बाहेर पडले. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, चर्चेदरम्यान राहुल गांधींनी चीनकडून करण्यात आलेली घुसखोरी तसंच लडाखमध्य तैनात सैन्याला सुसज्ज करण्याचा मुद्दा उपस्थित केला असता त्यांना बोलू देण्यात आलं नाही.

राष्ट्रीय सुरक्षेचा महत्वाचा मुद्दा असताना समिती सैन्यांच्या गणेवशावर चर्चा करण्यात वेळ वाया घालवत होती असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, संरक्षणप्रमुख बिपीन रावत यांच्या उपस्थितीत भारतीय सैन्य दल, हवाई दल आणि नौदलाच्या गणवेशाच्या मुद्यावर चर्चा सुरु होती. यावेळी राहुल गांधी यांनी दखल देत यावर चर्चा करण्यात वेळ वाया न घालवता राजकीय नेतृत्वाने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर तसंच लडाखमध्ये चीनसोबत लढणाऱ्या भारतीय सैन्याला बळकट कसं करता येईल यावर चर्चा केली पाहिजे असं मत व्यक्त केलं.

समिती अध्यक्ष ज्युएल ओराम यांनी राहुल गांधी यांना बोलण्यास परवानगी दिली नाही. यामुळे राहुल गांधी नाराज झाले आणि बैठक सोडून निघून गेले. राहुल गांधी गेल्यानंतर काँग्रेस नेते राजीव सातव आणि रेवंथ रेड्डी यांनीही बैठक सोडली.