नगरच्या जागेसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर या जागेसाठी मी प्रयत्न करेन असं राहुल गांधी म्हणतील असं वाटलं होतं. मात्र, त्यांनी सुजय विखेंना काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढण्याचा धक्कादायक सल्ला दिला, असा खळबळजनक खुलासा काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील केला आहे. लोणी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदाचा  राजीनामा राहुल गांधींनी स्विकारल्यानंतर आता हा खुलासा करण्याची योग्य वेळ असल्याचे सांगत त्यांनी मनातली खदखद बोलून दाखवली. साडेचार वर्षे विरोधीपक्ष नेतेपद सांभाळण्याचं फलीत काय तर काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीकडून लढण्याचा सल्ला मिळणं दुर्देवी होतं, असंही ते यावेळी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विखे म्हणाले, नगरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार सलग तीनदा पराभूत झाला होता, म्हणून ही जागा काँग्रेसला सोडावी अशी आमची मागणी होती. निवडून येण्याची क्षमता असल्याने डॉ. सुजय विखेंना उमेदवारी द्यावी असा आमचा आग्रह होता. यासाठी मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करीत असतानाच राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी त्याचवेळी पत्रकार परिषद घेतली आणि आमचे वडील बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. पवारांकडून आमच्या वडिलांबाबत केले गेलेले वक्तव्य मनाला वेदना देणारं होतं. पवारांच्या या पत्रकार परिषदेनंतर डॉ. सुजय विखेंनी तडकाफडकी भाजपात जाण्याची घोषणा केली. दरम्यान, मुलानेच भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याने आपण विरोधीपक्ष नेतेपदावर रहायचे नाही असं मी ठरवंल होतं. त्याचबरोबर आमच्या वडिलांचा अपमान झाल्याने मी राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही असंही जाीहर केलं होतं.

विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपद सांभाळताना गेल्या साडेचार वर्षात राज्यात ज्या काही घटना घडल्या त्यांना न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. समाजातील प्रत्येक घटकाला विधानसभेत न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा काँग्रेस पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झाला. तसेच माझ्या प्रयत्नांमुळे राज्यात सरकारला शेतकरी कर्जमाफी द्यावी लागली, असे ते म्हणाले.

दरम्यान, थोरातांवरही नाव न घेता त्यांनी टीकास्र सोडले. नगरची जागा काँग्रेसकडे येऊ नये यासाठी पक्षातूनच काही जणांनी प्रयत्न केले असा आरोपही त्यांनी केला आहे. सभागृहात काम करताना आपल्याला पाठींबा नव्हता, आपली जुनी प्रकरणे चव्हाट्यावर येऊ नये यासाठी काही लोक शांत होते आपल्याला पाठींबा देत नव्हते असा आरोपही विखे यांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलून आपण पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावरुन विखे काँग्रेस सोडणार की काँग्रेसमध्येच राहणार याबाबत त्यांचे तळ्यात-मळ्यात असल्याचे दिसले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhis advice to fight ncps sign was shocking says vikhe patil
First published on: 27-04-2019 at 13:29 IST