कलंकित लोकप्रतिनिधींना पाठिशी घालणाऱया केंद्र सरकारच्या वटहुकूमाला कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला विरोध म्हणजे निव्वळ फार्स असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने बुधवारी केली. देशात एकामागून एक घोटाळे समोर येत असताना, त्याबद्दल एक शब्दही न बोलता केवळ या वटहुकूमाला विरोध करण्याची राहुल गांधी यांची भूमिका संशयास्पद आहे, असे पक्षाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, टू जी घोटाळ्यावर राहुल गांधी यांनी एक चकार शब्द काढला नाही. राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळा किंवा कोळसा खाण वाटप घोटाळ्याबद्दलही ते कधीच काही बोलले नाहीत. त्यामुळेच केवळ या वटहुकूमाला विरोध करण्याची राहुल गांधी यांची भूमिका संशयास्पद आहे. जर हा वटहुकूम मागे घेण्यात आला, तर त्याचे श्रेय देशवासियांनाच दिले पाहिजे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.
भाजपने या वटहुकूमाला कधीच विरोध केला नाही, हा कॉंग्रेसचा आरोपही त्यांनी फेटाळला.