Mumbai-Bengaluru Superfast Train: भारतीय रेल्वेने बंगळुरू-मुंबई दरम्यान दुसरी सुपरफास्ट ट्रेन सुरू करण्यास मान्यता दिली आहे. उद्यान एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर आता जवळजवळ ३० वर्षांनी ही नवीन थेट ट्रेन मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत सदर निर्णय जाहीर केला. दोन मेट्रो शहरांना आणि राज्याच्या राजधानीला जोडणाऱ्या नवीन ट्रेनला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

प्रल्हाद जोशी एक्स पोस्टमध्ये म्हणाले, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना या ट्रेनसाठी मी विनंती केली होती. आमची दीर्घकाळापासूनची ही मागणी होती. सदर सुपरफास्ट ट्रेन कर्नाटकातील तुमकुरु, दावणगेरे, हवेरी, हुबळी-धारवाड आणि बेळगाव या मार्गावरून मुंबई शहरात जाईल. लाखो प्रवाशांना या कनेक्टिव्हीटीचा फायदा होईल आणि यानिमित्ताने व्यापार वाढेल.

प्रल्हाद जोशी यांनी आणखी एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनी म्हटले, बंगळुरू-मुंबईला थेट जोडणाऱ्या उद्यान एक्सप्रेसप्रमाणे आणखी एक ट्रेन सुरू करावी, अशी मागणी मागच्या ३० वर्षांपासून होत होती.

नव्या मुंबई-बंगळुरू ट्रेनचे वेळापत्रक

नवी मुंबई-बंगळुरू सुपरफास्ट ट्रेन मध्य कर्नाटकातील हुबळी-धारवाड मार्गे धावेल. बंगळुरू-मुंबई-बंगळुरू सुपरफास्ट ट्रेन तुमाकुरू, दावणगेरे, हावेरी, हुबळी-धारवाड आणि बेळगाव या स्थानकांवर थांबेल. महाराष्ट्र कोणत्या स्थानकांवर ट्रेनचे थांबे असतील याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

उद्यान एक्सप्रेसची माहिती

सध्या उद्यान एक्सप्रेस बंगळुरू-गुंटकल-सोलापूर मार्गावरून धावते. नव्या सुपरफास्ट ट्रेनमुळे दोन्ही शहरातील प्रवाशांसाठी मोठी सुविधा प्राप्त होणार आहे. उद्यान एक्सप्रेसला दोन्ही शहरातील १,१५३ अंतर कापण्यासाठी २३ तासांचा वेळ लागतो. ही ट्रेन रोज धावत असून या मार्गावर ३१ थांबे आहेत.