महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५ जून रोजीचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. आरोग्यासंदर्भातील समस्यांमुळे राज यांचा हा बहुचर्चित दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. मनसेनं यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तर राज यांच्या या दौऱ्याचं भवितव्य त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यावर अवलंबून असल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने दिलीय.

नक्की पाहा >> Photos: राज ठाकरेंची पुण्यातील पुस्तकांची शॉपिंग चर्चेत! दीड तास पुस्तकं चाळल्यानंतर २०० पुस्तकांची खरेदी; बिलाचा आकडा…

उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचा राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध असतानाच आता राज यांना उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांमुळे हा दौराच पुढे ढकलला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. राज ठाकरेंची २२ मे रोजी पुण्यामध्ये सभा होणार आहे. मात्र या सभेनंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे. डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच राज ठाकरे दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र डॉक्टरांचा नकार असेल तर हा दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. राज यांची तब्बेतीच्या कारणास्तव दौरा पुढे ढकलला जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अर्थात ही चर्चा फक्त शक्यतांच्या आधारे केली जात असले तरी राज हे काही दिवसांपूर्वीच पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतल्याच्या पार्श्वभूमीवर याकडे पाहिलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी राज अचानक पुणे दौरा अर्धवट सोडून मुंबईत परत आले होते. हा दौरा अर्धवट सोडून परत येण्यामागे राज यांना पायाला झालेल्या दुखापतीचं दुखण्याने पुन्हा डोकं वर काढल्याचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. एक ते दीड वर्षांपूर्वी राज यांच्या पायाला दुखापत झाली होती.
या दुखापतीसंदर्भात मध्यंतरी त्यांनी उपचार घेतले होते. मात्र आता हा त्रास त्यांना पुन्हा सुरु झालाय. अद्याप मनसेतर्फे अधिकृत कोणीही यासंदर्भात सांगितलं नसलं तरी सुत्रांनी ही शक्यता व्यक्त केली आहे.

पुण्यातील सभेनंतर राज डॉक्टरांचा पुन्हा सल्ला घेणार आहेत. सल्ल्यानुसार दौऱ्यासंदर्भातील आखणी केली जाईल. डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिला की त्यांनी अयोध्या दौरा करावा तर ते दौऱ्यावर जातील. डॉक्टरांच्या सल्ल्यावर सर्व अवलंबून आहे. त्यानुसारच राज निर्णय घेतील, असं सांगण्यात येत आहे. राज यांच्या पायासंदर्भातील समस्येवर उपचार म्हणून शस्त्रक्रीया करण्याची पुन्हा गरज लागू शकते असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज असल्याचंही सांगितलं जात आहे. याच कारणामुळे राज यांच्या दौऱ्यासंदर्भात प्रश्नचिन्हं निर्माण झालं आहे. शस्त्रक्रीया झाली तर ते लगेच दौऱ्यावर जाणार नाहीत. अद्याप तरी स्थगिती देण्यात आलेली नाही. पण डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आणि शस्त्रक्रीयेची शक्यता बघता हा अंदाज व्यक्त केला आहे.