Raja Raghuvanshi Case : इंदोर येथील रहिवासी राजा रघुवंशी याची हनिमूनसाठी मेघालय येथे गेल्यानंतर हत्या झाली. या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीला राजा रघुवंशी हा बेपत्ता झाल्याचे मानले जात होते, पण काही दिवस शोध घेतल्यानंतर एक शेवटचा फोन, एक टूर गाईड आणि मागे ठेवण्यात आलेलं मंगळसूत्र अशा लहान मोठ्या गोष्टींमुळे अखेर पोलिसांनी एका हत्येच्या गुन्ह्याची उकल केली आहे. ज्यामध्ये राजा रघुवंशी याची पत्नी आणि तिच्या साथीदारांचा सहभाग देखील समोर आला आहे.
टूर गाईड
या संपूर्ण प्रकरणात एका स्थानिक टूर गाईड Albert Pde याची भूमिका खूपच महत्त्वाची ठरली आहे. या टूर गाईडने पोलिसांना सांगितले की, २३ मे च्या सकाळी त्याने सोनम आणि राजा यांना मावलाखियाट येथे पाहिले होते आणि त्यांच्याबरोबर इतर तीन अनोळखी पुरुष देखील होते.
कॉल डेटा रेकॉर्ड आणि लोकेशन ट्रॅकिंग वापरून तपासणी केली असता, राजा रघुवंशी याला जीवंत पाहिले गेले तो हा अखेरचा क्षण होता.
त्यानंतर राजा रघुवंशी त्याची पत्नी बेपत्ता झाल्याच्या मुद्दा सोडून पोलिसांनी इतर शक्यतांचा विचार करणे सुरू केले.
मागे ठेवलेलं मंगळसूत्र
या जोडप्याचा शोध घेतला जात असताना त्यांच्या होमस्टे खोलीची झडती घेण्यात आली. यावेळी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना खोलीत सोनमचे मंगळसूत्र आणि अंगठी सापडली. डेप्युटी इंस्पेक्टर जनरल डीएनआर मारक यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, “एक विवाहित महिला हनिमून दरम्यान तिचे मंगळसूत्र कसे मागे ठेवू शकते? – यामुळे आमच्या मनात पहिला संशय निर्माण झाला.”
शेवटचा फोन कॉल
सोनमने २३ मे रोजी राजा रघुवंशी याच्या आईला फोन केला होता, तो दिवस ग्यारस म्हणजेच उपवासाचा होता. त्या दिवशी सोनमने सांगितले की ते दोघे ट्रेक करत धबधब्याकडे जात आहेत. जेव्हा तिला काहीतरी खाऊन घे असा आग्रह केला असता तेव्हा तिने उत्तर दिलं की, “घुमने के चक्कर मैं व्रत थोडी तोड दूंगी (फिरण्याच्या नादात उपवास थोडीच मोडेन) ”. फोन चालू असताना तिला धाप लागल्यासारखे ऐकू आले आणि अचानक फोन कट झाला, असे राजा रघुवंशीच्या आईने सांगितले.
राजा रघुवंशी आणि सोनम यांचे लग्न इंदोर येथे ११ मे रोजी झाले. काही दिवसानंतर ते त्यांच्या हनिमूनसाठी मेघालय येथे गेले. त्यानंतर २३ मे रोजी ते बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. त्याच्या १० दिवसांनंतर राजा रघुवंशी याचा मृतदेह एका खोल दरीत आढळून आला.
सुरूवातीला बेपत्ता असलेली सोनम ही उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथे २ जून रोजी आढळून आली, येथे ती पोलिसांसमोर हजर झाली. सोनमचा प्रियकर असल्याचे सांगितले जात असलेला राज सिंह कुशवाह याला नंतर अटक करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणातील पाचही आरोपींना मेघालय पोलिसांकडून शिलाँग येथे आणण्यात आले आणि न्यायालयासमोर हजर करण्यात आले.