Sonam Raghuvanshi Alleged Boyfriend Raj Kushwah Arrested: मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी याची हनिमूनसाठी मेघालयला गेल्यानंतर हत्या केल्याच्या आरोपाखाली पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाह याला अटक करण्यात आली आहे. याचबरोबर या प्रकरणातील इतर तीन आरोपी, जे राज कुशवाहचे मित्र आहेत, त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाह याच्या आईने त्यांचा मुलगा निर्दोष असल्याचे सांगत त्याला सोडण्याची मागणी केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राज कुशवाह याची आई म्हणाली की, “माझा मुलगा असे काहीही करू शकत नाही. तो फक्त २० वर्षांचा आहे. तो माझे सर्वस्व आहे. माझा मुलगा सोनमच्या भावाच्या कारखान्यात काम करायचा. त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. मी सरकारला विनंती करते की त्यांनी त्याला निर्दोष सिद्ध करावे. तो निर्दोष आहे.”
याचबरोबर राज कुशवाह याच्या बहिणीनेही तिचा भाऊ निर्दोष असल्याचे म्हटले आहे. एएनआयशी बोलताना ती म्हणाली, “विकी आणि राज दोघेही माझे भाऊ आहेत. ते कधीही असे काही करू शकत नाहीत. माझा भाऊ राज कुठेही गेला नव्हता. तुम्ही त्याच्या ऑफिसमधील लोकांनाही विचारू शकता. माझी एकच मागणी आहे, माझ्या भावाला सोडण्यात यावे. तो हत्येत सहभागी नाही. माझा भाऊ निर्दोष आहे.”
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, पती राजा रघुवंशी यांच्या हत्येतील प्रमुख संशयित आरोपी सोनम रघुवंशी गाझीपूर जिल्ह्यातील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये सापडली. सोनम रघुवंशीने दावा केला आहे की तिला ड्रग्ज देण्यात आले होते, त्यामुळे ती गाझीपूरला कशी आली हे तिला माहित नाही.
मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय राजा आणि सोनम हे मे महिन्यात त्यांच्या लग्नानंतर मेघालयात हनिमूनसाठी गेले होते. या दरम्यान राजा आणि सोनम दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. यानंतर गेल्या आठवड्यात राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडला होता. पण पत्नी सोनमचा काहीच पत्ता लागत नसल्याने तिनेच पतीची हत्या केलाचा संशय व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान सोनमच्या अटकेनंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातून तिचा कथित प्रियकर राज कुशवाह याच्यासह तीन जणांना अटक केली आहे.