राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुकांसाठी अद्याप दोन वर्षांचा कालावधी असला तरी भाजपामध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. राजस्थानमध्ये भाजपाच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या नेहमीच प्रबळ दावेदार राहिल्या आहेत, पण केंद्रीय नेतृत्वाशी त्यांच्या असलेल्या संबंधांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान, वसुंधरा राजेंनी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. भाजपाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याच्या प्रश्नावर भाष्य करताना वसुंधरा राजे म्हणाल्या, ‘हे केवळ इच्छा करून होत नाही. राज्याचा पुढील मुख्यमंत्री तोच असेल ज्याला छत्तीस समाजांचां पाठिंबा मिळेल.

“मी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की ते २०२३ च्या विधानसभा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयार असतील. जर त्यांची तयारी मजबूत असेल तरच ते मैदानावर जिंकू शकतील,” असे वसुंधरा राजे यांनी म्हटले आहे. माझी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्याचा पुढील मुख्यमंत्री जनतेला आवडेल तोच असेल.

सर्व समाजाला पाठिंबा देण्याचा अधिकार आहे आणि तीच व्यक्ती राज्य करू शकते, ज्याला सर्वांचा पाठिंबा मिळत आहे, असे वसुंधारा राजे म्हणाल्या. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि माजी राज्यमंत्री महिपाल मदेरना यांच्या आईला श्रद्धांजली वाहण्यासाठी वसुंधरा राजे गुरुवारी दोन दिवसांसाठी जोधपूरला पोहोचल्या होत्या.

जनतेला काय हवे आहे हे महत्त्वाचे

जोधपूरच्या सर्किट हाऊसमध्ये मुक्काम ठोकून राजे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जिल्ह्यातील भाजपाच्या परिस्थितीबाबत स्थानिक नेत्यांच्या बैठका घेतल्या. गेहलोत हे जोधपूर जिल्ह्यातील सरदारपुरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांच्या संख्येबद्दल विचारले असता,”हे केवळ इच्छेने होत नाही, जनतेला काय हवे आहे हे जास्त महत्त्वाचे आहे,” असे त्या म्हणाल्या.

काँग्रेस हे बुडणारे जहाज

वसुंधरा राजेंनी काँग्रेसचे ‘बुडते जहाज’ असे वर्णन केले आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाची स्थिती आणि अंतर्गत भांडणे पाहून आपल्यालाही काँग्रेस हे बुडणारे जहाज असेच वाटत आहे असे त्या म्हणाल्या. राजे यांनी भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यांना राजस्थान विधानसभा आणि लोकसभेच्या पुढील निवडणुकांची तयारी करण्यास सांगितले.