पीटीआय, जयपूर
जयपूरच्या सवाई मानसिंह (एसएमएस) या सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) रविवारी रात्री उशिरा आग लागून सहा रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. हे सर्व रुग्ण ‘क्रिटिकल केअर सपोर्ट’वर होते. या घटनेची चौकशी करण्यासाठी राजस्थान सरकारने उच्चस्तरीय समिती नेमली आहे.

‘एसएमएस’ रुग्णालय हे राजस्थानातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय आहे. आग लागली तेव्हा ‘आयसीयू’मध्ये ११ रुग्णांवर उपचार सुरू होते. आग झपाट्याने पसरल्यामुळे त्यातील पाचच रुग्णांना वाचवण्यात यश आले, अशी माहिती ट्रॉमा केंद्राचे प्रभारी डॉ. अनुराग धाकड यांनी दिली. ते म्हणाले की, “दोन महिला आणि सहा पुरुषांसह सहा जणांचा मृत्यू झाला. इतर पाच जणांवर उपचार सुरू आहेत. निरनिराळ्या ‘आयसीयूं’मध्ये १४ रुग्ण दाखल होते. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.”

रविवारी मध्यरात्रीच्या सुमाराला रुग्णालयाच्या स्टोरेज भागामध्ये आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटने झाल्याचा अंदाज आहे. आगीनंतर अतिदक्षता विभागाच्या धुराने काळवंडलेल्या भिंती, आगीमुळे वेडीवाकडी झालेली उपकरणे आणि फुटलेल्या काचा असे चित्र होते. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मंत्री जोगराम पटेल आणि जवाहर सिंह बेधाम यांनी रुग्णालयाला भेट घेऊन पाहणी केली. काँग्रेस सरचिटणीस आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही घटनास्थळाला भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तर ही घटना हृदयद्रावक असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केली. तर मृतांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांनी केली.

रुग्णांचे नातेवाईक संतप्त

आगीच्या घटनेनंतर मृत आणि पीडित रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी काही वेळ निदर्शनेही केली. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आणि रुग्णांना वाचवण्याऐवजी स्वतः पळून गेले असा आरोप काहीजणांनी केला.

माझी आई बरी होत होती. पण ही घटना घडली. धूर येऊ लागला तेव्हा वॉर्डात १५ ते १६ जण होते. लोक आपापल्या रुग्णांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या आईला कोणीही मदत केली नाही. माझ्या मोठ्या भावाने एक टॉर्च मिळवली आणि तिला शोधून बाहेर आणले. मी तिला वाचवू शकलो नाही, मी काहीच करू शकलो नाही. – जोगिंदर, मृत रुक्मिणीचा मुलगा