पीटीआय, नवी दिल्ली

देशाच्या अनेक भागात शनिवारीही उष्णतेची लाट कायम राहिली. राजस्थानातील फलोली येथे तब्बल ५० अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. या उष्णतेची झळ कोट्यवधी लोकांना बसली.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी देशात सर्वाधिक तापमानाची नोंद १ जून २०१९ रोजी राजस्थानातील चुरू येथे ५०.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. त्यानंतर शनिवारी फलोली येथे दुसऱ्या क्रमांकाच्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली.

देशाच्या केवळ उत्तर आणि मध्य भागालाच नव्हे तर हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भाग आणि ईशान्य भारतातील आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनाही वाढत्या उष्णतेने हैराण केले. अधिकृत आकडेवारीनुसार, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातील किमान १७ ठिकाणी ४५ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवले गेले.

हेही वाचा >>>मुस्लीम मतपेढीसाठी मुजरा…; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘इंडिया आघाडी’वर टीका

राजस्थानात प्रचंड उष्णता

फलोलीशिवाय राजस्थानातील बारमेर येथे ४८.८ अंश, जैसलमेरमध्ये ४८ अंश आणि बिकानेरमध्ये ४७.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

दिल्लीत सहा ठिकाणी तापमानाने ४५ अंशाचा पारा ओलांडला. त्याशिवाय कूचबिहारमध्ये ४०.५ अंश, आसामच्या सिल्चरमध्ये ४० अंश, लमडिंगमध्ये ४३ अंश, इटानगरमध्ये ४०.५ अंश आणि पासिघाटमध्ये ३९.६ अंश सेल्सियस असे उच्चांकी तापमान नोंदवले गेले.

हवामान खात्याचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यांत २९ मेपर्यंत उष्णतेची लाट राहणार आहे.