राजस्थान काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना लक्ष्य केलं असून ‘गद्दार’ असा उल्लेख केला आहे. “सचिन पायलट हे गद्दार आहेत. मुख्यमंत्री म्हणून माझ्या जागी त्यांना मुख्यमंत्री केलं जाऊ शकत नाही,” असं वक्तव्य अशोक गेहलोत यांनी केलं आहे. अशोक गेहलोत यांच्या टीकेला सचिन पायलट यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

अशोक गेहलोत यांनी केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे. तसंच याची काहीच गरज नव्हती असंही म्हटलं आहे. “अशोक गेहलोत यांनी मला अक्षम तसंच गद्दार असं म्हटलं असून अनेक आरोप केले आहेत. हे सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत,” असं सचिन पायलट म्हणाले आहेत.

काँग्रेस पक्षाला मजबूत करणं याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं असल्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. “राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यशस्वी कशी होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण सध्या देशाला याची गरज आहे,” असं मत सचिन पायलट यांनी मांडलं आहे.

सचिन पायलट गद्दार!; राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांचे वक्तव्य; काँग्रेसमधील तीव्र मतभेद चव्हाटय़ावर

“देशात फक्त काँग्रेस पक्षच भाजपाला आव्हान देऊ शकतो. गुजरातमध्ये निवडणुका होणार असून अशोक गेहलोत प्रभारी आहेत. भाजपाचा पराभव करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे,” असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.

पुढील वर्षा राजस्थानमध्ये होणाऱ्या निवडणुकांकडेही त्यांनी लक्ष वेधलं. “अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन वेळा राजस्थानमध्ये सरकार स्थापन केलं. पण त्यानंतर दोन वेळा पराभव झाला. पण त्यानंतही पक्ष नेतृत्वाला त्यांनीच सरकार चालवावं असं वाटत आहे. आम्ही तेदेखील मान्य केलं. यावेळी आमचं लक्ष आगामी निवडणूक जिंकण्याकडे असलं पाहिजे”.

“सध्याच्या स्थितीत त्यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने अशा मुद्द्यांवर बोलणं शोभत नाही,” अशी टीका सचिन पायलट यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशोक गेहलोत काय म्हणाले आहेत?

पायलट यांनी २०२०मध्ये बंडखोरी केली होती, इतकंच नव्हे तर आपल्याच पक्षाचं सरकार पाडण्याचाही प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री बनवलं जाऊ शकत नाही, असं गेहलोत म्हणाले. पायलट यांच्या बंडामागे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात होता असा आरोप करून गेहलोत म्हणाले, ‘‘काँग्रेसच्या काही आमदारांना गुडगाव येथील रिसॉर्टवर एक महिन्याहून अधिक काळ डांबून ठेवण्यात आलं होतं आणि केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान तेथे वारंवार भेट देत होते. पायलट यांच्यासह बंडखोर आमदारांना दहा कोटी रुपये देण्यात आले होते. त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत.’’