पीटीआय, अहमदाबाद

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर या परिसरात राहणारे राजेश पटेल मदतीसाठी घटनास्थळी धावले. त्यांनी आणि इतर स्वयंसेवकांनी मृतदेह बाहेर काढण्यात आणि जखमींना रुग्णालयात नेण्यात प्रशासनाला मदत केली. त्यांनी ढिगाऱ्यातून ७० तोळे सोन्याचे दागिने, ५० हजार रुपये आणि काही अमेरिकी डॉलर गोळा करत पोलिसांच्या स्वाधीन केले.

५७ वर्षीय पटेल बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. ‘१२ जून रोजी भयानक आवाज ऐकू आला आणि आगीचा एक महाकाय गोळा आकाशात उडताना दिसला,’ असे पटेल म्हणाले. अपघातस्थळापासून फक्त ३०० मीटर अंतरावर राहणारे पटेल तत्काळ घटनास्थळी धावले. त्यांच्या नातेवाईकांकडून खासगी रुग्णालय चालवले जाते. या रुग्णालयाच्या रुग्णवाहिकांतून त्यांनी तत्काळ मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात केली. येथे स्ट्रेचरची व्यवस्था नव्हती. त्यामुळे पटेल यांनी इतर स्वयंसेवकांच्या साथीनी जुन्या साड्या, चादरी आणि गोण्या यांचा वापर केला.

बचावकार्य पूर्ण केल्यानंतर पटेल यांनी प्रवाशांचे मौल्यवान सामान वाचवण्याचे काम सुरू केले. ‘जळून विखुरलेल्या आणि पडलेल्या १० ते १५ हँडबॅगमधून आम्हाला ७० तोळे सोन्याचे दागिने, ८ ते १० चांदीच्या वस्तू, काही पारपत्रे, भगवद्गीतेची प्रत, ५० हजार रुपये रोख आणि २० डॉलर सापडले. आम्ही ते पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवले,’ अशी माहिती पटेल यांनी दिली. प्रत्येक मौल्यवान वस्तू तसेच सामानाची तपशीलवार यादी तयार करण्याचे काम देण्यात आले आहे.

राजेश पटेल कोण?

पूर्वी छायाचित्रकार म्हणून काम करणारे पटेल २००८ च्या अहमदाबाद साखळी स्फोटांनंतर अहमदाबाद शासकीय रुग्णालयात स्वयंसेवकाचे काम करत होते. रुग्णालयाच्या अपघात विभागात झालेल्या एका स्फोटात त्यांनी त्यांचे दोन जवळचे मित्र गमावले. सध्या बांधकाम व्यवसायात कार्यरत असले तरी ते आणि त्यांचे सहकारी आपत्कालीन स्थितीत स्वयंसेवकाचे कार्य करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमान दुर्घटनेनंतर सापडलेल्या वस्तूंचे दस्तावेजीकरण केले जाईल. अहमदाबाद शहर पोलिसांनी मृतांच्या कुटुंबाला त्यांच्या प्रियजनांच्या वस्तू मिळाव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. ढिगाऱ्यातून सापडलेली प्रत्येक वस्तू मृतांच्या कुटुंबीयांना परत केली जाईल.– हर्ष संघवी,गृह राज्यमंत्री, गुजरात