Rajnath Singh big warning to Pakistan over military infrastructure near Sir Creek : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरूवारी (२ ऑक्टोबर) सीमेलगत असलेल्या सर क्रीक भागात लष्करी पायाभूत सुविधांच्या विस्ताराबाबत पाकिस्तानला इशारा दिला आहे. अशा कारवाईला असं चोख उत्तर दिलं जाईल की या भागाचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून जाईल.

“स्वातंत्र्याचे ७८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील सर क्रीक भागात सीमेच्या मुद्द्यावर एक वाद निर्माण केला जातो. भारताने अनेकदा संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, पण पाकिस्तानचा हेतू चांगला नाही . त्यांचा उद्देश चांगला नाही. ज्या पद्धतीने पाकिस्तानी सैन्याने सर क्रीकशी लागून असलेल्या भागांमध्ये त्यांच्या लष्करी पायाभूत सुविधा वाढवल्या आहेत, त्यातून त्यांचा हेतू दिसून येतो.”

संरक्षण मंत्री पुढे बोलताना म्हणाले की, “भारतीय लष्कर आणि बीएसएफ भारताच्या सीमांचे सतर्कतेने रक्षण करत आहेत. जर सर क्रीक भागात पाकिस्तानकडून कोणतेही धाडस केले गेल तर त्यांना असे सडेतोड उत्तर दिले जाईल की, इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून जाईल.”

सिंह पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या सर्व उद्देशांची यशस्वीपणे पूर्तता केली आहे. तणाव वाढवून पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू करणे हा त्याचा उद्देश नव्हता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला जवळपास पाच महिने उलटून गेल्यानंतर त्यांनी ही टिप्पणी केली आहे. गुजरातच्या भुज येथे सैनिकांना संबोधित करताना सिंह म्हणाले की सीमेच्या पलीकडेल दहशतवाद्यांच्या विरोधात युद्ध सुरू राहिल. यावेळी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्र्‍यांनी शस्त्र पूजन देखील केले.

सिंह म्हणाले की ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या संरक्षण प्रणालीला भेदण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. मात्र भारतीय सेनेने पाकिस्तानी एअर डिफेन्सला उघडं पाडलं आणि जगाला संदेश दिला की ते आपल्या शत्रूचे मोठे नुकसान करू शकतात.

ते म्हणाले की, “ऑफरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने लेहपासून ते सर क्रीक पर्यंत भारताच्या संरक्षण प्रणालीला भेदण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आपल्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत भारतीय सेनेने पाकिस्तानी एअर डिफेन्स पूर्णपणे उघडा पाडला आणि जगाला हा संदेश दिला की भारतीय लष्कर हवे तेव्हा आणि जिथे हवे तिथे पाकिस्तानचे मोठे नुकसान करू शकतात.”

सिंह म्हणाले की भारताने संयम बाळगला कारण त्यांची लष्करी कारवाई दहशतवादाविरुद्ध होती. हलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून , भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मिर या भागात दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्यात आला. यानंतर दोन देशांमध्ये काही दिवस संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळाले होते.