Rajnath Singh on Pakistan conducts nuclear tests : पाकिस्तान गुप्तपणे अण्वस्त्रांची चाचणी करत असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर चिंता व्यक्त केली जात आहे. यादरम्यान भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत हा “कोणत्याही संभाव्य परिस्थितीसाठी तयार आहे” असे सिंह म्हणाले आहेत. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना राजनाथ सिंह यांनी सीबीएस शोमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या चर्चांवर भाष्य केले आहे.
पाकिस्तान करत असलेल्या अण्वस्त्राच्या विकासाबद्दल विचारले असता सिंह म्हणाले, अशा बातम्यांनी भारत बेचैन होत नाही. “ज्यांना चाचणी घ्यायची आहे, त्यांना घेऊ द्या; आपण त्यांना कसे थांबवू शकतो?” असे राजनाथ सिंह म्हणाले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, “जे काही घडेल, आपण अशा कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहोत.”
पुढे राजनाथ सिंह यांना विचारण्यात आले की जर पाकिस्तानने पुढाकार घेत चाचणी केली तर भारतही तसेच करेल का, यावर त्यांनी उत्तर दिलं की, “ते तसं करतात का हे आधी पाहूया.”
पाकिस्तान अण्वस्त्र चाचणी करणार?
इतर देशांनी अलीकडेच केलेल्या अण्वस्त्र चाचण्यांचा हवाला देत, अमेरिका देखील जवळपास ३० वर्षांनंतर अण्वस्त्रांच्या चाचण्या सुरू करेल असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच जाहीर केले आहे. त्यानंतर भारताच्या संरक्षण मंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्रम्प यांनी असा युक्तीवाद केला की इतर देश जमिनीखाली चाचण्या घेत असताना असे करण्यापासून स्वतःला रोखणारा अमेरिका हाच एकमेव देश असू नये.
ट्रम्प यांनी विशेषतः पाकिस्तानचा एक उदाहरण म्हणून उल्लेख केला, त्यांनी आरोप केला की पाकिस्तान अजूनही अण्वस्त्रांचे प्रयोग करत आहे.
यादरम्यान, पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सीबीएस न्यूजला सांगितले की, पाकिस्तान अण्वस्त्र चाचणीवर “एकपक्षी स्थगिती (unilateral moratorium)” कायम ठेवून आहे.
पाकिस्तानने जोर देऊन सांगितले की, “आम्ही अण्वस्त्र चाचणी घेणारे पहिले नव्हतो आणि त्या पुन्हा सुरू करणारेही आम्ही नसू”. अशा प्रकारे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रिटी (CTBT) वर स्वाक्षरी केलेली नसतानाही आपण चाचण्या न घेण्याबाबत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पाकिस्तानने केला आहे.
