Rajnath Singh Operation Sindoor: मे महिन्यात पाकिस्तानबरोबर झालेल्या चार दिवसांच्या संघर्षाने सीमेवर कधीही काहीही घडू शकते याची आठवण करून दिली, असे सांगत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताने नेहमीच “युद्धासारख्या परिस्थितीसाठी” तयार राहिले पाहिजे, असे म्हटले.
सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरचा राष्ट्रीय सुरक्षा आणखी भक्कम करण्याच्या तयारीसाठी केस स्टडी म्हणून वापर करता येईल.
“ऑपरेशन सिंदूरचा आपण एक केस स्टडी म्हणून वापर करायला हवा. यातून आपण नव्या गोष्टी शिकू शकतो आणि आपला भविष्याचा मार्ग आखू शकतो. या घटनेने आपल्याला पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, आपल्या सीमेवर कधीही आणि कुठेही काहीही घडू शकते”, असे ते म्हणाले.
“आपण त्या परिस्थितीला कठोर प्रत्युत्तर दिले असले आणि आपले सैन्य देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे तयार असले तरी, आपण आत्मपरीक्षण करत राहिले पाहिजे”, असेही सिंह म्हणाले. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरने भारताच्या स्वदेशी विकसित संरक्षण प्रणालींचा प्रभाव दाखवून दिला. “ऑपरेशन सिंदूर दरम्यान आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, ब्रह्मोस, आकाशतीर हवाई संरक्षण नियंत्रण प्रणाली आणि इतर स्वदेशी संरक्षण प्रणालींची ताकद आपण सर्वांनी पाहिली आहे”, असे राजनाथ सिंह म्हणाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
स्वदेशीकरणावरील सरकारच्या धोरणावर प्रकाश टाकताना राजनाथ सिंह म्हणाले की, भारताचे संरक्षण उत्पादन २०१४ मध्ये सुमारे ४६,००० कोटी रुपये होते. ते आता १.५१ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. यामध्ये खाजगी क्षेत्राचे ३३,००० कोटी रुपयांचे योगदान आहे.
एका दशकापूर्वी १,००० कोटी रुपयांपेक्षा कमी असलेली संरक्षण निर्यात आता अंदाजे २४,००० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे आणि मार्च २०२६ पर्यंत ती ३०,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
ऑपरेशन सिंदूर
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. या हवाई हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता, जो भारतीय लष्कराने यशस्वीपणे परतावून लावला होता.
