Rajnath Singh on POK : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दोन दिवसांच्या मोरक्कोच्या दौऱ्यावर गेले आहेत. पहिल्यांदाच भारताचे संरक्षण मंत्री मोरक्को भेटीवर गेले आहेत. या दौऱ्यावेळी सिंह हे मोरक्कोतील टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे उद्घाटन करणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा आफ्रिकेतील पहिला भारतीय संरक्षण उत्पादन कारखाना आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर सिंह यांची मोरक्कोचे संरक्षणमंत्री अब्देलतीफ लौदियी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक होणार आहे. तत्पूर्वी सिंह यांनी मोरक्कोची राजधानी रबात येथे भारतीय समुदायाला संबोधित केलं.

मोरक्कोमधील भारतीय समुदायाला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, “भारताप्रति तुमची भक्ती, स्नेह आणि प्रेम स्वाभाविक आहे. आपण जगभरात कुठेही असलो तरी आपण भारतीय आहोत हे विसरून चालणार नाही. भारतीय असल्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. आपण मोरक्कोत राहतो, इथे कमावतो, आपला उदरनिर्वाह करतो, मोरक्को आपली देखभाल करत आहे. त्यामुळे मोरक्कोबरोबर कुठलाही विश्वासघात होता कामा नये आणि हेच भारताचं चरित्र आहे.”

पाकव्याप्त काश्मीरबाबत राजनाथ सिंह यांचा मोठा दावा

संरक्षणमंत्री म्हणाले, “पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात येईल. त्या भागात राहणाऱ्या लोकांमधून आता तशी मागणी होत आहे. तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांच्या घोषणा ऐकल्या असतील. पाच वर्षांपूर्वी मी भारतीय लष्कराच्या एका कार्यक्रमासाठी काश्मीर खोऱ्यात गेलो होतो. त्या कार्यक्रमावेळी भाषण करत असताना मी म्हटलं होतं की पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला करून त्यावर ताबा मिळवण्याची गरज नाही. मुळात तो भाग आपलाच आहे आणि तो लवकरच भारतात समाविष्ट होईल. एक दिवस पीओके स्वतःच म्हणेल, मी सुद्धा भारत आहे. तो दिवस फार दूर नाही.”

राजनाथ सिंह यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, “पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगामध्ये जे केलं त्यानंतर आम्ही त्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं. मात्र आपण केवळ त्याच लोकांना मारलं ज्यांनी आपल्या लोकांना मारलं होतं. आपण त्यांच्या कुठल्याही सामान्य नागरिकाला अथवा सैनिकाला मारलं नाही. आम्ही त्यांच्या नागरी वस्तीवर अथवा लष्करी तळांवर, चौक्यांवर हल्ला केला नाही. आपण केवळ दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला.