जगातील सर्वात धोकादायक युद्धभूमी मानल्या जाणाऱ्या सियाचेन हिमनदी क्षेत्रात १२ हजार फुटांच्या उंचीपलीकडील सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना भेटण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सोमवारी त्या भागाला भेट देणार आहेत. संरक्षणमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह सिंह हे लेहमधील लष्कराच्या १४ कॉर्प्सचे मुख्यालय, तसेच श्रीनगरमधील १५ कॉर्प्सचे मुख्यालय यांनाही भेट देणार आहेत.

या दौऱ्यात लष्कराचे उच्चपदस्थ अधिकारी संरक्षणमंत्र्यांना पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवरील एकूण सुरक्षाविषयक परिस्थितीची, तसेच काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमांबद्दल माहिती देतील, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

राजनाथ सिंह हे आधी लडाखमधील थोइसे विमानतळावर येतील व तेथून ते लष्करी तळावर जातील. यानंतर ते सियाचेन हिमनदी भागात जाऊन लष्कराचे फील्ड कमांडर आणि सैनिक यांच्याशी संवाद साधतील.

काराकोरम पर्वतरांगांमधील सियाचेन हिमनदी हे जगातील सर्वात उंचीवरील लष्करी क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी सैनिकांना हिमदंश आणि प्रचंड वेगवान वारे यांना तोंड द्यावे लागते. हिवाळ्यात येथे हिमस्खलन आणि भूस्खलन सर्रास होतात आणि तापमान उणे ६० अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरू शकते. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षांत जगातील या सर्वोच्च युद्धभूमीवर १६३ सैनिकांना जीव गमवावा लागला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajnath singh siachen glacier
First published on: 03-06-2019 at 01:55 IST