दिल्ली विधानसभेत ठराव

राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी झालेली नियुक्ती ही ‘घटनाबाह्य’ असल्याचा ठराव दिल्ली विधानसभेने गुरुवारी संमत केला. अस्थाना यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आपल्या पक्षाच्या नेत्यांना ‘त्रास देण्यासाठी’ घेण्यात आला असल्याचा आरोप करून, सत्ताधारी आम आदमी पक्षाने या नियुक्तीवरून केंद्र सरकावर टीका केली.

दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अल्पावधीच्या चर्चेद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना; अस्थाना यांची नियुक्ती ‘घटनाबाह्य’ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचे नमूद करणारा ठराव ‘आप’चे आमदार संजय झा यांनी मांडला. गुजरात कॅडरच्या या वादग्रस्त अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त म्हणून दिल्लीवर ‘थोपवण्यात’ आल्याबाबत या ठरावात नापसंती व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारने मंगळवारी अस्थाना यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आणि निवृत्तीपूर्वी या पदावर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली.