राम गोपाल यादव यांचे समाजवादी पक्षातील निलंबन मागे घेण्यात आले आहे. अवघ्या महिनाभरात समाजवादी पक्षाने राम गोपाल वर्मा यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द केली आहे. राम गोपाल यादव हे समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील नेते असतील, हे समाजवादी पक्षातून स्पष्ट करण्यात आले आहे. यादव पक्षाच्या सचिव, प्रवक्तेपदी कायम असणार आहेत. तसे प्रसिद्धीपत्रक समाजवादी पक्षाकडून जारी करण्यात आले आहे. या प्रसिद्धीपत्रावर पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची स्वाक्षरी आहे.
‘हे तर घडणारच होते. पक्षात पुन्हा मिळालेला प्रवेश ही नेताजींची कृपा आहे. नेताजी कधीही माझ्या विरोधात नव्हते,’ अशी प्रतिक्रिया राम गोपाल यादव यांनी दिली आहे. मात्र आपण कधीही पक्षविरोधी कृती केली नसल्याचे यादव यांनी स्पष्ट केले आहे.
२४ ऑक्टोबरला समाजवादी पक्षातून राम गोपाल यादव यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. राम गोपाल यादव हे समाजवादी पक्षातील मोठे नेते आहेत. राम गोपाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे खंदे समर्थक मानले जातात. अखिलेश यादव यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील शिवपाल यादव यांच्याकडे असणारी खाती काढून घेतली होती. यानंतर अखिलेश यादव यांना शह देण्यासाठी त्यांच्या गटातील राम गोपाल यादव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. अजूनही समाजवादी पक्षातील ही यादवी संपुष्टात आलेली नाही. मात्र आता राम गोपाल यादव यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे.
पक्षविरोधी कारवाया करत असल्याचा ठपका राम गोपाल यादव यांच्यावर ठेवण्यात आला होता. पक्षात दुही माजवून भाजपला मदत करत असल्याचा आरोप शिवपाल समर्थकांकडून करण्यात आला होता. त्यामुळेच यादव यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. मात्र आता त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे.
आठवड्याभरापूर्वी समाजवादी पक्षाच्या संसदीय समितीची बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या राज्यसभेतील नेत्याची निवडीवर चर्चा झाली. मात्र पक्षाला राम गोपाल यादव यांचा पर्याय सापडू शकला नाही. समाजवादी पक्ष हा १९ खासदारांसह राज्यसभेतील तिसरा मोठा पक्ष आहे. बुधवारी राम गोपाल यादव यांनी जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरुन राज्यसभेत सरकारवर जोरदार टीका केली होती.