‘पाकिस्तानचा हात’ वक्तव्यावरून गदारोळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाकिस्तानच्या आदेशावरून नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष (पीडीपी) जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनवण्यासाठी एकत्र आल्याचा आरोप करून नाहक वाद निर्माण करणारे भाजपचे सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी राम माधव यांना गुरुवारी दिवसअखेर वक्तव्य मागे घेण्याची नामुष्की ओढवली.

काँग्रेस, एनसी आणि पीडीपी या तीनही भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येत राज्यात पुन्हा सरकार बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना फॅक्स करून सरकार स्थापनेचा दावाही केला होता. मात्र राज्यपालांनी विधानसभा भंग केली.

राज्यपालांच्या कृतीचे समर्थन करताना राम माधव यांनी विरोधक एकत्र येण्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एनसी आणि पीडीपी दोघांनीही बहिष्कार टाकला होता. आता सीमेपलीकडून नवा आदेश आल्यामुळे सरकार बनवण्याचा दावा केला गेला,’ असे वक्तव्य राम माधव यांनी केले.

माधव यांच्या या वादग्रस्त विधानावर ‘एनसी’चे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून माधव यांना ‘दावा सिद्ध करा नाहीतर माफी माफा’ असे आव्हान दिले. ‘माझा पक्ष पाकिस्तानच्या आदेशावर चालतो असा दावा आपण केला आहात. आता तो सिद्ध करा. तुमच्याकडे रॉ, एनआयए, आयबी या गुप्तचर यंत्रणा आहेत.

पुरावे जमा करा,’ असे ट्वीट अब्दुल्ला यांनी केल्यानंतर मात्र, राम माधव यांनी माघार घेतली. मिझोरामच्या दौऱ्यावर रवाना झालेल्या माधव यांनी ट्वीट करून एकप्रकारे अब्दुल्ला यांची ‘माफी’ मागितली. ‘परकीय दबाव नसल्याचे तुम्ही म्हणता. त्यामुळे मी माझे वक्तव्य मागे घेत आहे..

एनसी आणि पीडीपी यांना एकमेकांबद्दल खरोखरच प्रेम असल्याने संयुक्त सरकारचा प्रयत्न तुम्ही केलात. आता पुढील निवडणूकही एकत्र लढा,’ असे ट्वीट माधव यांनी केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram madhavs retraction after the accused
First published on: 23-11-2018 at 02:56 IST