राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली नसली तरीही २०२४ पर्यंत भगवान रामाचे दर्शन सामान्य भाविकांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत. तसंच, जानेवारी महिन्यात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडे आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अयोध्येत दोन दिवसीय चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं असून रविवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तसंच, रामराज्याभिषेक सोहळा म्हणजेच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राम मंदिराचा अभिषेक करण्यात येणार आहे. यासाठी देशभरातून एक लाख संतांना आमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व हिदू परिषदेच्या वरिष्ठ नेत्याने दिली. पीटीआयच्या हवाल्याने दि प्रिंटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार म्हणाले की, “देशभरातून एक लाख महंतांना बोलावण्यात येणार आहे. विहिंपकडून त्यांच्या निवासाची सोय करण्यात येणार आहे. तसंच, या कार्यक्रमासाठी अयोध्येत येणाऱ्या भक्तांना मोफत भोजनाची सोयही विहिंपकडून करण्यात येणार आहे.” २१ ते २३ जानेवारी दरम्यान हा कार्यक्रम होणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली आहे.
रामराज्याभिषेकाआधी भारतभर निघणार शौर्य यात्रा
राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याआधी बजरंग दलाकडून २२८१ शौर्य यात्रा काढण्यात येणार आहेत. ३० सप्टेंबरपासून १५ ऑक्टोबरपर्यंत ही पदयात्रा असणार आहे. या यात्रेदरम्यान बजरंग दलाकडून धार्मिक बैठकांचेही आयोजन करणार आहे. हिंदू समाजात सामाजिक सहकार्याबाबत एकता जोपासण्यासाठी तरुणांकडून या कॅम्पेनचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आहे. जेणेकरून देशातील आणि देशाबाहेरील आव्हानं हिंमतीने झेलता येतील.
मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्याआधी होणार पूजा
अभिषेक दिनाआधी देशभरातील विविध मठ आणि मंदिरात पूजा, यज्ञ, हवन आणि आरती करण्यात येणार आहे. अभिषेकानंतर देशभरातील कोट्यवधी भाविकांना प्रसादही वाटण्यात येणार असल्याची माहिती अलोक कुमार यांनी दिली.
भारतात जानेवारीत साजरी होणार दिवाळी
अभिषेक दिनी रामभक्तांनी आपल्या घरात पाच मातीचे दिवे लावण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. एकूणच या दिवशी देशभर दिवाळी साजरी होण्याची शक्यता आहे.
प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला मोदीही राहणार हजर?
दरम्यान, २१ ते २३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या जंगी कार्यक्रमात प्राण प्रतिष्ठेदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदीही अयोध्येत येणार आहेत. विश्व हिंदू परिषदेकडून त्यांना आमंत्रण जाणार असल्याचेही वृत्त आहे.