भारत आणि रोमानिआ देशांत अत्यंत चांगले व मजबूत संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये सातत्याने सांस्कृतिक देवाण-घेवाण होत असते. त्याचाच प्रत्यय आता पुन्हा एकदा आला आहे. रोमानिआच्या अकरावीच्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारतातील काही भागांचा समावेश करण्यात आल्याची माहिती रोमानिआचे राजदूत राडू ओक्टावियन डोबरे यांनी याची माहिती दिली.

दोन्ही देशांमध्ये सुरूवातीपासूनच चांगले संबंध असून गेल्या काही वर्षांपासून ते आणखी मजबूत झाले आहेत. दोन्ही देशातील नागरिकांमध्ये पूर्वीपेक्षा संपर्क चांगला वाढला आहे. दोन्ही देशांदरम्यान अत्यंत निकटचे सांस्कृतिक संबंध आहेत, असे राजदूत डोबरे यांनी सांगितले. भारतीयांशी आमचे खूप जवळचे संबंध आहेत. आम्ही अकरावीच्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारतातील काही महत्वाच्या भागांचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक खंडात मुलांना याचे धडे दिले जातात, असेही त्यांनी सांगितले.

 

रोमानिआत दोन बॉलिवूड चॅनेल्स २४ तास प्रसारित होतात याची माहितीही त्यांनी दिली. आम्हाला दोन्ही देशातील संबंध आणखी मजबूत करायचे आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यस्त्वाच्या भारताच्या दावेदारीला रोमानिआचे आपले समर्थन असल्याचे ते म्हणाले. दोन्ही देशातील संबंध आणखी निकट आणण्यासाठी पर्यटनाचे मोठे स्थान असून भारताच्या पर्यटन नकाशावर रोमानिआला पाहायचे आहे.