Ranya Rao Case Update : सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कन्नड अभिनेत्री रान्या रावने आरोप केला आहे की तिला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी अनेक वेळा मारहाण केली, जेवण नाकारले आणि रिकाम्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. डीआरआयच्या अतिरिक्त महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात रान्याने तिने तिच्यावरील आरोप फेटाळले असून तिला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं असल्याचं म्हटलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या या कन्नड अभिनेत्रीला बेंगळुरू विमानतळावर १२.५६ कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह अटक करण्यात आली. परप्पाना अग्रहारा तुरुंगाच्या मुख्य अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रात रान्याने दावा केला आहे की तिला विमानातच अटक करण्यात आली आणि डीआरआयने स्पष्टीकरण देण्याची संधी न देता तिला ताब्यात घेतले. यावेळी तिला १०-१५ वेळा थप्पड मारली.’ तिने असाही दावा केला की वारंवार मारहाण होऊनही, तिने डीआरआय अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या निवेदनांवर सही करण्यास नकार दिला. तथापि, अत्यंत दबावाखाली तिला अखेर ५०-६० टाइप केलेली आणि ४० रिकाम्या पांढऱ्या पानांवर सही करण्यास भाग पाडण्यात आले, असे तिने सांगितले.
“मला अटक झाल्यापासून न्यायालयात हजर होईपर्यंत, मी ओळखू शकणाऱ्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर शारीरिक हल्ला केला, १०-१५ वेळा कानाखाली मारली. वारंवार हल्ला होऊनही, मी त्यांनी तयार केलेल्या जबाबांवर सही करण्यास नकार दिला”, असं रान्या म्हणाली. “प्रचंड दबाव आणि शारीरिक हल्ल्यामुळे, मला डीआरआय अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या ५०-६० टाईप केलेल्या आणि सुमारे ४० रिकाम्या पांढऱ्या पानांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले”, असे पत्रात म्हटले आहे. अटक झाल्यानंतर काही दिवसांनी, रान्याचा कोठडीतील एक फोटो व्हायरल झाला , ज्यामध्ये ती तणावाखाली आणि डोळ्यांखाली काळे डाग असलेली दिसत होती.
या तस्करी प्रकरणात बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने तिचा जामीन नाकारल्यानंतर एका दिवसानंतर हे स्फोटक पत्र आले आहे. या प्रकरणात अनेक वळणे आली आहेत . तीन दिवस डीआरआय कोठडीत असलेल्या रान्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी झोप आणि जेवण नाकारले
तिने असेही म्हटले आहे की ३ मार्च रोजी संध्याकाळी ६.४५ ते ४ मार्च रोजी संध्याकाळी ७.५० वाजेपर्यंत अधिकाऱ्यांनी तिला जाणूनबुजून झोप आणि जेवणही नाकारले. तिच्याविरुद्धच्या खटल्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, रान्याने दावा केला की तिच्याकडून कोणतेही सोने जप्त केले गेले नाही. तीन चित्रपटांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्रीने आरोप केला की दिल्लीतील काही व्यक्तींनी, अधिकारी म्हणून स्वतःला सादर करून, या प्रकरणातील इतर संशयितांना वाचवण्यासाठी तिला खोटे गुंतवले.
डीआरआयला दिलेल्या तिच्या जबाबातील अनेक विसंगतींपैकी ही एक आहे ज्यामुळे या प्रकरणात कुतूहल निर्माण झाले आहे. ७ मार्च रोजी, डीआरआयला दिलेल्या तिच्या पहिल्या अधिकृत जबाबात, अभिनेत्रीने तस्करीची कबुली दिली आणि तिच्या ताब्यातून १७ सोन्याचे बार जप्त करण्यात आल्याचे सांगितले.