Indigo Flight Rat News: आपल्या घरात एखादा उंदीर दिसला की घरातल्या मंडळींची जशी त्रेधातिरपिट उडते, तसाच काहीसा अनुभव सोमवारी इंडिगोच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आला. कारण विमानात चक्क एक उंदीर दिसल्यामुळे प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे कॅबिनमध्ये सर्व प्रकारच्या नियमांचं पालन केल्यानंतरही हा उंदीर विमानाच्या कॅबिनमध्ये कसा शिरला? याचं उत्तर अद्याप प्रशासनाला सापडलेलं नाही. मात्र, या सर्व प्रकारामुळे Indigo विमान कंपनीच्या प्रशासनाला सविस्तर निवेदन सादर करावं लागलं.

नेमकं काय घडलं?

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार कानपूरहून दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या विमानावर घडला. दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी या विमानाचं दिल्लीच्या दिशेनं उड्डाण होणं अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात हे उड्डाण जवळपास दीड तासानंतर म्हणजेच साडेचारच्या सुमारास झालं. आणि या प्रचंड विलंबासाठी कारणीभूत ठरला तो एक उंदीर! दिल्लीहून हे विमान २ वाजून १० मिनिटांनी कानपूर विमानतळावर उतरलं. त्यानंतर ठरवून दिलेल्या नियमित तपासण्या आणि स्वच्छतेसंदर्भातील प्रोटोकॉलचं पालन झाल्यानंतर व आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांना विमानात प्रवेश देण्यात आला.

एकीकडे हे सगळं होत असताना अचानक विमानातील एका क्रू मेंबरला विमानात एक उंदीर असल्याचं लक्षात आलं. तातडीने यासंदर्भातली माहिती विमानतळ प्रशासन व इंडिगो प्रशासनाला देण्यात आली. प्रवाशांचा मनस्ताप टाळण्यासाठी त्यांना लागलीच विमानातून खाली उतरवण्यात आलं आणि विमानतळावर प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आलं. सर्व प्रवासी उतरल्यानंतर विमानात ‘शोधमोहीम’ राबवली गेली. उंदीर महाशय नेमके कुठे लपलेत हे शोधून काढून त्या उंदराला विमानाबाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना तब्बल दीड तास लागला!

विमानतळ प्रशासनाचं निवेदन

दरम्यान, यासंदर्भात कानपूर विमानतळाचे संचालक संजय कुमार यांनी आज तकशी बोलताना घडलेला प्रकार सांगितला. “एका प्रवाशाने विमानात उंदीर पाहिल्याची तक्रार केली. क्रू मेंबरनं हे पाहिल्यानंतर तातडीने पुढची पावलं उचलण्यात आली. विमानाची संपूर्ण तपासणी करण्यात आली. तो उंदीर विमानाच्या बाहेर काढण्यात आला. या सगळ्या प्रकारामुळे विमानाचं उड्डाण तीन तास उशीराने झालं”, अशी माहिती संजय कुमार यांनी दिली.

पूर्ण तपासणीअंतीच विमानाला उड्डाणाची परवानगी

या उंदीर प्रकरणामुळे संबंधित विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशांना आणखी त्रास होऊ नये, यासाठी उंदीर बाहेर काढल्यानंतरदेखील विमानतळाची संपूर्ण तपासणी करण्यात आली. सारंकाही ठीक असल्याची खात्री पटल्यानंतरच विमानाला पुन्हा उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली.